कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाबाधित रुग्णासाठी   आवश्यक सोईसुविधांमध्ये वाढ करावी                              - कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे दि.26 : - आंबेगाव तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाबाधित रुग्णासाठी आवश्यक सोईसुविधांमध्ये वाढ करावी. तसेच आवश्यकता असल्यास खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात यावी, तळेघर, घोडेगाव व मंचर येथील कोविड उपचार केंद्र व बेडची संख्या वाढवावी. आवश्यक साधनसामुग्रीचे गरजेप्रमाणे नियोजन करावे, मंचर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांबरोबरच याठिकाणच्या आवश्यक सुविधेबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सूचना राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज केल्या.  


          कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात प्रशासनाकडून करण्यात येणा-या उपाययोजनांबाबत कामगार व उत्पादनशुक्ल मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, तहसीलदार रमा जोशी, कार्यकारी अभियंता बी. एन बहिर उपस्थित होते.


           कामगार व उत्पादन शुल्कमंत्री वळसे पाटील म्हणाले, मंचर उपजिल्हा रुग्णालयात कोविड उपचार केंद्र सुरु झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, कोरोना निदानासाठीच्या चाचण्यांचे प्रमाणे आणखी वाढवावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.             


               जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, जिल्ह्यात रुग्णांच्या तपासणीचे काम वाढविण्यात आले आहे. तसेच ऑक्सिजन बेडची संख्याही वाढविण्यात आली आहे. कन्टेनमेंट झोनची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. पोलीस व प्रशासनाने नियमाचे उलंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. भरारी पथकामार्फत नियमांची अंबलबजावणी न करणाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जातील . असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.


 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, आंबेगाव तालुक्यात मंचर शहरात रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. जास्त रुग्ण असलेल्या गावांमध्ये लक्ष द्यावे.  


 डॉ.सीमा देशमुख,डॉ चंदाराणी पाटील,डॉ सुरेश ढेकळे यांनी चर्चेत भाग घेतला.