सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ओपन जिमचे ऑनलाईन उदघाटन संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ओपन जिमचे ऑनलाईन उदघाटन संपन्न


पुणे, दिनांक २९ ऑगस्ट २०२० : 


राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आज शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजी मा. खासदार श्री. व्ही. मुरलीधरन राज्यसभा सदस्य यांच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिमचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाले. 


ओपन जिमचे उदघाटन मा. खासदार श्री. व्ही. मुरलीधरन राज्य मंत्री, परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय व्यवहार, भारत सरकार यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून झाले. यावेळी कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर , प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक क्रीडा विभाग डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी खासदार श्री. व्ही. मुरलीधरन यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ही ओपन जिमची सुविधा सुरु करताना मला खूप आनंद होतोय. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या 'फिट इंडिया' मोहिमेला सुद्धा एक वर्ष पूर्ण होते आहे. निमित्ताने विद्यापीठात ओपन जिम सुरु होतेय हा एक चांगला योगायोग आहे. 


मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑलिम्पिक मध्ये मिळवलेल्या सुवर्णयशाच्या आठवणींना व्ही. मुरलीधरन यांनी यावेळी उजाळा दिला. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी मधील आत्ता पर्यंतच्या दैदीप्यमान यशाबद्दलही त्यांनी सांगितले. 


मेजर ध्यानचंद यांचे भारताच्या हॉकी मधील योगदान पाहता भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे, की फिट इंडिया मोहीम ही ध्यानचंद यांच्या जयंती दिवसापासून म्हणजेच २९ ऑगस्ट पासून सुरु करण्यात येईल.    


याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी सुरु केलेल्या फिट इंडिया मोहिमेच्या निमित्ताने गेले वर्षभर झालेल्या उपक्रमांची माहिती दिली. 


यावेळी बोलताना कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर म्हणाले, पुणे विद्यापीठ हे केवळ शैक्षणिक प्रगती साठी प्रसिद्ध नसून खेळाला प्राधान्य देण्यासाठी सुद्धा विद्यापीठ प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठात मॉर्निंग वॉक करिता येणाऱ्या नागरिकांसाठी ही ओपन जिमची सुविधा अत्यंत उपयुक्त अशी आहे. 


यावेळी पुणे विद्यापीठात सध्या उपलब्ध असलेल्या क्रीडा सुविधांबद्दल कुलगुरू करमळकर यांनी माहिती दिली. 


गेल्या वर्षी पुणे विद्यापीठात फिट इंडिया मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी प्रसिद्ध खेळाडू तेंडुलकर आले होते, त्याबद्दल करमळकर यांनी यावेळी सांगितले.  


------------------------


फिट इंडिया मुव्हमेंटच्या पुणे विद्यापीठातील अंमलबजावणीच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात आम्ही भरघोस प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांमध्ये या ओपन जिमद्वारे आम्ही पुढचा टप्पा गाठत आहोत. या ओपन जिमचा विद्यापीठात मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नक्कीच चांगला फायदा होणार आहे. 


- *प्रा. (डॉ.) नितीन करमळकर* ,


  कुलगुरू, 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  


-------------------------


कार्यक्रमाची प्रस्तावना करताना राजेश पांडे म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व विद्यापीठांनी खेलो इंडिया मध्ये सहभागी होण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता. पंतप्रधान यांनी खेळांविषयी सर्व विद्यापीठांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाने सुद्धा खेळांचे महत्व ओळखून विविध उपक्रम राबवले आहेत. पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आणि नागरिकांना या ओपन जिमचा फायदा होणार असून या ओपन जिम साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी खासदार व्ही. मुरलीधरन यांचे विद्यापीठाच्या वतीने आभार मानले. 


कार्यक्रमाचे सूत्र संचलन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार केले. आभार डॉ. दीपक माने यांनी मानले.