मंदिरे नसलेल्या गणेश मंडळांना शासनाने मंडपाचा खर्च द्यावा- पतित पावन संघटनेची मागणी ; आरोग्यविषयक प्रबोधन करण्यास मिळेल प्रोत्साहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


पुणे : शहरातील अनेक गणेश मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करता मंदिरात गणपती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य असला तरी अनेक गणेश मंडळे दरवर्षी केवळ मंडपातच गणेश मूर्तीची स्थापना करीत उत्सव साजरा करतात, अशा गणेश मंडळाची मंदिरे नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या प्रार्दुभावात गणेशोत्सवाची परंपरा व संस्कृतीचे जतन होण्यासाठी सर्व गणेश मंडळांना १० बाय १० फूट उत्सव मंडपाचा खर्च प्रशासनाने देऊन कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गणेश मंडळांनी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी पतित पावन संघटना पुणे शहरतर्फे केली आहे. 


 


पतित पावन संघटनेच्या वतीने महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, पालिका प्रशासनातील सर्व नेते मंडळी व अधिकारी यांना स्वप्नील नाईक, विजय क्षिरसागर, ललित खंडाळे, निलेश जोशी, दिनेश भिलारे व योगेश वाडेकर यांनी निवेदन दिले. 


 


स्वप्निल नाईक म्हणाले, यंदा गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले तरी उत्सव साजरा करायचा कुठे असा प्रश्न मंडळांना पडला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने होईल. परंतु बाजारपेठा व व्यापार ठप्प असल्याने मंडपाची स्थापना करणे देखील मुश्किल होणार आहे. 


 


याशिवाय कोरोनाच्या प्रार्दुभावात पुणे शहरातील ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती त्या नागरिकांमध्ये पुणे मनपाच्या कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थेबद्दल जो असंतोष निर्माण झाला असून खाजगी रुग्णालयांनी चालवलेली लूट थांबविण्यात यावी. कोरोनापेक्षा नागरिक खाजगी हॉस्पिटलच्या बिलाल घाबरत आहेत. त्यामुळे पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये नागरिक दाखल होतात. पण तिथे नागरिकांना अनेक गैरसोईचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत अधिकारी नेमून नागरिकांची होणारी लूटमार आणि गैरसोय थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 


 


पुण्याचा हॉटस्पॉट ठरलेल्या रेड झोन मधील म्हणजेच भवानी पेठ आणि व कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय येथील रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. तसेच नागरिकांमध्ये देखील पुरेशी जनजागृती झाली आहे. त्यामुळे उर्वरीत पुण्यात लागू असलेल्या नियमांप्रमाणे या भागातील व्यवस्थापन सुुरु करावे. या परिसरातील व्यवहार व बाजार पेठांमधील आर्थिक चक्र पूर्व पदावर यावे व सर्व सामान्य समाज बांधवाचे उदरनिर्वाह व रोजगार सुरळीत व्हावे यासाठी पतित पावन संघटना पुणे शहरतर्फे निवेदन देण्यात आले.