पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**
पुणे दि. 3 :- पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज औंध येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन खाटानिर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची, तसेच नॉन-कोवीड रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या कक्षाची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयाकडून सुरु असलेल्या उपचाराबाबत विचारपूस केली. यावेळी कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. शर्मिला गायकवाड, डॉ. किरण खलाटे, यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरासह ग्रामीण भागातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारी वर्ग चांगले काम करत आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संकटावर मात करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बळकटीकरणाकरीता निधीची कमतरता पडणार नाही. रुग्णालयाचे बळकटीकरण करतांना दर्जेदार काम करण्यार भर असला पाहिजे. कोरोना सारख्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सोईसुविधा देण्यावर आमचा भर आहे, असेही जिल्हाधिकारी श्री राम म्हणाले.
जिल्हाधिकारी राम यांनी ऑक्सिजन पाइपलाइन, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन टॅंक, स्थापत्य दुरूस्त्या, विद्युत दुरूस्त्या, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सुरु असलेल्या कामकाजाची माहिती घेवून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.
*****