एका महामानवाने संविधान दिले , तर दुसऱ्या महामानवाने स्वाभिमान दिला... - कुलगुरू डॉ. नितीन करमळकर   

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


एका महामानवाने संविधान दिले , तर दुसऱ्या महामानवाने स्वाभिमान दिला... - कुलगुरू डॉ. नितीन करमळकर 


 


            लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष पुरस्कार वितरण सोहळा संपन्न 


 


पुणे, दि. १५ ऑगस्ट २०२० : 


 


      'एका महामानवाने आपल्याला संविधान दिले , तर दुसऱ्या महामानवाने स्वाभिमान दिला...'असं प्रतिपादन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष पुरस्कार वितरण सोहळा पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. 


 


      यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. राजेश पांडे, अधिसभा सदस्य डॉ. धनंजय लोखंडे, पदमश्री विखे-पाटील अध्यासनाचे प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर, डॉ. श्रीपाद ढेकणे, डॉ. विलास आढाव, डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, राजेंद्र राजगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर सावित्रीबाई फुले आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. त्यानंतर ईएमआरसी विभागाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावर तयार केलेली चित्रफीत दाखवण्यात आली. 


 


     आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. करमळकर पुढे म्हणाले, अण्णा भाऊंच्या साहित्यातून त्यांनी स्वाभिमानाने कसं जगायचं हा संदेश सामान्य जनतेला दिला आहे. चले जाव आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा तीन महत्वाच्या आंदोलनांत अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून लोकांच्या भावना चेतवण्याचं काम केलं. समाजाचं एकत्रीकरण व्हावं यासाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. साहित्यरत्न, लोकशाहीर आणि त्याच प्रमाणे अण्णा भाऊ साठे हे स्वातंत्र्यसेनानी होते. निसर्गाचे अत्यंत अप्रतिम वर्णन अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात दिसून येतं. लोकचळवळ निर्माण करण्यासाठी त्यांनी साहित्य निर्माण केले आहे, त्यामुळे त्याची उंची वेगळी आहे.  


     पुणे विद्यापीठात गेल्या पंधरा वर्षांपासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाने अध्यासन आहेत, याचा मला खूप अभिमान वाटतो. ही अध्यासने लोकाभिमुख होण्यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील राहील हा आमचा प्रयत्न असणार आहे., असा विश्वास कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी व्यक्त केला. 


 


     लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार' शाहीर नंदेश विठ्ठल उमप यांना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यंदाचा 'माता रमाई मातृशक्ती पुरस्कार' अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई श्रीमती सावित्रीमाई साठे यांना प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारांमध्ये ५००० रुपये, विद्यापीठाचे सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि समता सप्तक यांचा समावेश आहे.  


 


     कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांनी केले. यावेळी त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त गेल्या वर्षभरात झालेल्या उपक्रमांची माहिती सांगितली. अध्यासनामार्फत सहा महिन्यांचा मराठी आणि इंग्रजी भाषेतील 'भारतीय राज्यघटना प्रमाणपत्र अभ्यासक्रम' सुरु केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 


 


     दोन्ही पुरस्कार्थी यांचे परिचय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी दिला. यावेळी त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. 


 


     पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई श्रीमती सावित्रीमाई साठे म्हणाल्या, हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी मोठी धन-दौलत आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद झाला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा वारसा आमचे कुटुंब इथून पुढेही कायम चालवत राहील. 


 


     शाहीर नंदेश उमप त्यांच्या मनोगतात म्हणाले, हा पुरस्कार मी माझे वडील शाहीर विठ्ठल उमप आणि लोकशाहीर अण्णा भाऊंच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या इतर सर्व शाहिरांना समर्पित करतो आहे. अण्णा भाऊ साठे असं म्हणायचे, की मला माणसे खूप आवडतात, माझी या सर्व गरीब, दीनदुबळ्यांवर खूप निष्ठा आहे, म्हणूनच मी त्यांचं लेखन अभ्यासपूर्वक करतो. गरिबांवर झालेल्या अन्यायावर मात करण्याचे कामी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने केले आहे, आणि म्हणूनच त्यांच्या नावाआधी स्वातंत्र्यसैनिक साहित्यरत्न साहित्य सम्राट हे विशेषण मला महत्वाचे वाटते. या पुरस्काराच्या रूपाने मला अण्णा भाऊ साठे यांचा आशीर्वाद मिळतोय असं मी म्हणेन. अण्णा भाऊ साठे यांच्या सारखं माणसाला माणसाशी जोडण्याचं काम आम्हाला सुद्धा करता यायला हवं. अण्णा भाऊ साठे हे विज्ञानवादी साहित्यिक आणि शाहीर होते. 


  


     यावेळी शाहीर नंदेश उमप यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली लावणी 'माझी मैना गावाकडं राहिली...' याप्रसंगी शाहीर नंदेश उमप यांनी गाऊन दाखवली. 


 


     कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले तर सूत्रसंचलन डॉ. प्रशांत साठे यांनी केले.