दहीहंडी फोडून वृध्द महिलांनी दिला निरोगी भारताचा संदेश शिवसंग्राम दहीहंडी उत्सव : सेन्ट जोन्स होमला धान्य, मास्क सॅनिटायझरची मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


पुणे : कोरोना महामारीचे सावट सर्व क्षेत्रांबरोबर सण उत्सावांवर देखील आले आहे. अशा काळात माणूसकी जपत शिवसंग्रामच्यावतीने सेन्ट जोन्स होम या आश्रमातील वृध्द महिलांबरोबर अनोख्या पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यात आली आहे. ठेवूया १ मीटर सुरक्षित अंतर कोरोना होऊदे छूमंतर, सतत धूवा २० सेकंद हात त्यामुळे कोरोनाचा होईल घात, कोरोना वायरसला त्याच्याच स्टाइलने हरवा असा संदेश देत वृध्द महिलांनी व शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी निरोगी भारताचा संदेश दिला.


 


शिवसंग्राम पुणे च्यावतीने गुरूवार पेठेतील सेन्ट जोन्स होम मधील वृध्द महिलांबरोबर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शिवसंग्राम पुणेचे प्रदेश सचिव शेखर पवार, प्रवक्ते तुषार काकडे, महेंद्र कडू, समीर निकम, किरण ओहोळ, कलिंदी गोडांबे, महेश पवार, सचिन दरेकर, कौतुभ कर्णिक, संजय लोंढे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन चैतन्य पवार यांनी केले. शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आश्रमातील वृध्द महिलांना धान्याची मदत देण्यात आली. यामध्ये तांदूळ, डाळ, गहू, साखर, तेल त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड देखील देण्यात आले. 


 


आनंद सराफ म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये जे सण साजरे केले जातात ते निर्सगाबद्ल कृतज्ञता व्यक्त करणारे आणि मानवी नाते संबंध दृढ करणारे आहेत. दहीहंडी उत्सवाला गेल्या काही वर्षात वेगळे वळण लागत होते, त्या वळणाचा विचार करून या तरुणांनी सांस्कृतिक उत्सवाला सामाजिक स्वरूप दिले आहे. तरुणांवर नेहमी टिका केली जाते की ही भरकटलेली पिढी आहे. परंतु त्यांच्या अशा चांगल्या कामाचे देखील कौतुक होणे आवश्यक आहे, असे ही त्यांनी सांगितले.


 


चैतन्य पवार म्हणाले, यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे मोठ्या स्वरूपात केला जाणारा दहिहंडी उत्सव रद्द करून शिवसंग्रामच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत हा उत्सव साजरा केला जात आहे. गुरूवार पेठेतील सेन्ट जोन्स होम व कात्रज कोंढवा रोड येथील उमेद केअर सेंटर या आश्रमात धान्याची मदत देण्यात आली आहे. तसेच महानगर पालिकेचे सफाई कामगार, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, पोलीस बांधवांना मास्क, सॉनिटायझर आणि फेस शिल्डचे वाटप करून हा उत्सव साजरा करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.  


 


फोटो ओळ: शिवसंग्राम पुणेच्यावतीने गुरूवार पेठेतील सेन्ट जोन्स होम येथील वृध्द महिलांबरोबर दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी आश्रमातील महिलांना धान्यवाटप, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.