सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रासेयो विद्यार्थ्यांची कामगिरी कौतुकास्पद - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी   

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


  


पुणे, दि. १८ ऑगस्ट २०२० :


         सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची माहिती घेत विद्यार्थी स्वयंसेवकांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता राजभवन येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. 


बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले की, दैनंदिन शिक्षणाबरोबर सामाजिक भान देण्याचे काम रासेयो करीत असते. कोरोना महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझर बनविणे, गरजू लोकांपर्यंत आवश्यक साधनसामुग्री पोहोचविणे, पोलीस मित्र म्हणून काम पहाणे, आरोग्य सर्वेक्षण करणे अशी समाजपयोगी कामे करून विद्यार्थ्यांनी रासेयो स्वयंसेवक म्हणून आपले वेगळेपण देशाला दाखवून दिले आहे. सर्वांगीण माणूस घडण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील रासेयोचा वाटा महत्वपूर्ण असणार आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 


यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गेल्या वर्षभरात रासेयो स्वयंसेवकांनी गिनीज विश्वविक्रम, पंढरीची वारी, सांगली व कोल्हापूर याठिकाणी केलेले पुरग्रस्त लोकांसाठीचे काम या संपूर्ण कामाचा आढावा घेतला. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे हे काम इतर विद्यापीठाच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण असून गिनीज विश्वविक्रम करणारे पुणे विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्याचे सांगितले. 


 


          यावेळी राज्यपाल यांना विद्यापीठाकडून गिनीज विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र भेट देण्यात आले. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेणाऱ्या अहवालाचे प्रकाशन राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रसेनजीत फडणवीस, अधिसभा सदस्य श्रीमती बागेश्री मंठाळकर, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते