राजकारण हे भारतीय मूल्यांवर आधारित हवे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भावनाः मिटसॉगच्या 16 व्या तुकडीचा ऑनलाइन शुभारंभ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी                                                  दि. 21 ऑगस्ट 2020



पुणे, दिः 21 ऑगस्टः“राजकारण हे भारतीय मूल्यांवर आधारित हवी. आचार, विचार आणि व्यवहार या तीनही गोष्टींबरोबर त्याला विचारधारेची मान्यता असावी. समाजहीत व मानवतेच्या भावनेतून केलेले राजकारण हे सकारात्मक दृष्टीचे असल्याने यातूनच समाज निर्मिती होते.” अशी भावना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी व्यक्त केली. 


माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या ‘मास्टर इन पॉलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्नमेंट’ च्या 16 व्या तुकडीचा ऑनलाईन शुभारंभ झाला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी कर्नाटक येथील आमदार दिनेश गुंडूराव, उत्तर प्रदेश येथील खासदार रितेश पांडे आणि गुजरात येथील काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.


तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व कुलगुरू प्रा. डॉ. एन.टी.राव हे उपस्थित होते.


बंडारू दत्तात्रेय म्हणाले,“ स्वातंत्र्यपूर्वी जे राजकारण होते ते देशभक्तीचे होते. महात्मा गांधी, पं.जवाहरलाल नेहरू, लोकमान्य तिळक, भगतसिंग सारख्या हजारो देशभक्तांनी समर्पण भावनेने केलेल्या बलिदानाचे फळ म्हणजे देशाला स्वातंत्र मिळाले. पण, स्वातंत्र्यानंतर राजकारण हे एक व्यापार झाला आहे. त्यामुळे नव पिढीने या क्षेत्रात येतांना भारतीय मूल्यांवर आधारित राजकारण करावे. स्वार्थासाठी राजकारण करू नये. दानव बनण्याऐवजी मानवतेच्या भावनेतून समाज कार्य करावे. या क्षेत्रात असतांना समाज विघटन करू नका आणि विरोधाला विरोध करू नका.”


“समाज एकजूटीसाठी व निर्मिती राजकारणात सकारात्मकता असावी. समाजातील सर्व स्तरावरील लोकांची सेवा करा. नव पिढी जेवढी समोर येईल तेवढे राजकारण प्रगत होईल. शिक्षण, आरोग्य व रोजगार या गोष्टींना महत्व देऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीला गती आणू शकू. भविष्यातील भारतासाठी मूल्याधारित विचार धारा आणि विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. तसेच, युवकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता असल्यास समाज उन्नतीचे कार्य होईल.”


हार्दीक पटेल म्हणाले, “ देशाच्या संसदेत 40 वर्षापेक्षा कमी वयाचे 20 टक्के लोक आहेत. त्यामुळे हे चित्र बदलावयचे असेल तर युवकांनी राजकारणाची धुरा सांभाळावी. रस्त्यावर उतरण्यापेक्षा विधानसभा आणि संसद भवनमध्ये जाण्यासाठी संविधानाचा अभ्यास करावा. भारत या शब्दाचा अर्थ देशातील प्रत्येक गांव आहे ही गोष्ट लक्षात असू दया. युवकांनी विरोधाचे नाही तर समाधानाचे राजकारण करावे. त्यासाठी कामाची ब्ल्यू प्रींट असावी. देशात रोजगार व शिक्षण ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे मोफत शिक्षण आणि चांगले आरोग्य कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे. ज्या दिवशी युवक एकत्रित येईल तेव्हा देशातून सोन्याचा धुर निघेल.”


दिनेश गुंडूराव म्हणाले,“ सामाजिक जीवनात बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन मिळत नाही परंतू सामाजिक सेवा करण्याचे भाग्य लाभते. येथे बर्‍याच वाटा दिसतात. देशातील प्रत्येक पार्टीचे धोरण व सूत्र वेगवेगळे आहे. त्यामुळे आपली आयडॉलॉजी कोणते आहे त्या तत्वानुसार पार्टीत प्रवेश करावा. राजकारण हे ऑर्ट ऑफ लाईफ असून ते तत्व युवकांनी लक्षात ठेवावे.”


रितेश पांडे म्हणाले,“राजकारण हे सामाजिक धोरण तयार करून नागरिकांच्या समस्या सोडवितात. आज कोविड 19 च्या काळात बर्‍याच समस्या निर्माण झाल्यात पण एका दृष्टीने विचार केला तर कित्येक क्षेत्रात संधी सुध्दा उपलब्ध करून दिल्या आहेत. यावर युवकांनी विचार करावा. कोविडच्या काळात जल, वायू व पर्यावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. या संधीचा फायदा घेऊन युवकांनी राजकारणात प्रवेश करून नागरिकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचा दिशेने कार्य करावे.”


प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड,“ विज्ञान आणि अधात्माच्या समन्वयातून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतून शिक्षण देणारे जगातील हे पहिले विद्यापीठ आहे. राजकारण व समाजकारणातून मानवकल्याण साधले पाहिजे. भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचा अभ्यास राजकारणात येऊ पाहणार्‍या युवकांनी करावा. यातूनच सामाजिक विकासाला गती मिळेल. धर्म म्हणजे कर्तव्य आहे. आज संपूर्ण जग भारताकडे अशाने पाहत आहे. 16 व्या तुकडीत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून जीवन प्रवास करावा. तसेच समाजातील सर्व स्तरांवरील लोकांचे कल्याण करावे.” 


राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ सुशिक्षीत तरूणांनी राजकारणात व समाजकारणात यावे यासाठी राजकारणाचे प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली संस्था एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट सुरू केली. भारतीय छात्र संसद, सरपंच परिषद व नॅशनल वुमेन्स पार्लमेंटच्या माध्यमातून हे कार्य करीत आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून देशातील सर्व विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती करतो की देशातील प्रत्येक राज्यात राजकारणाचे प्रशिक्षण देणारी शाळा सुरू करावी. त्यातून सुशिक्षित राजकारणी निर्माण होवून देशाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतील. असे प्रशिक्षण घेणार्‍या सर्वांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन सर्वांचा सामाजिक स्तर उंचवावा.”


डॉ.एन.टी.राव यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कार्याचा आढावा घेऊन एसओजी संदर्भात माहिती दिली.प्रा.डॉ. शैलश्री हरिदास यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. वामिनी जैन व अमित कुमार या विद्यार्थ्यांनी आपली भावना व्यक्त केली. 


अनुराधा पै यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी.पी. आपटे यांनी आभार मानले.


 


जनसंपर्क विभाग, 


माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे