पानशेतच्या पुराची आठवण साठ वर्षे कडे वाटचाल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


१२ जुलै, इ. स. १९६१ या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली.


 


 


इ.स. १९५० च्या दशकापर्यंत पुण्याचा पाणीपुरवठा पुण्यापासून १३ कि. मी. अंतरावर मुठा नदीवर बांधलेल्या खडकवासला धरणातून होत असे. वाढत्या वस्तीने खडकवासल्याचे पाणी विशेषतः उन्हाळ्यात कमी पडू लागल्याने, पुणे शहर तसेच शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून खडकवासल्याच्या पश्‍चिमेस पुण्यापासून ३८ कि.मी. अंतरावर मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधायचे ठरवले. १० ऑक्‍टोबर १९५७ साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली[१]. पहिल्या टप्प्यात ६ टीएमसी, तर दुसर्‍या टप्प्यात ११ टीएमसी क्षमतेचे हे धरण प्रस्तावित मुदतीनुसार जून, इ.स. १९६२ पर्यंत बांधून पुरे होणार होते. इ.स. १९५९-१९६०च्या सुमारास बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या एक वर्ष अगोदरच पुरे होऊ शकेल, असा विश्वास वाटल्याने भारताच्या केंद्रशासकीय पातळीवर तसा निर्णयही घेण्यात आला. [२]. बांधकामाच्या आराखड्यात पानशेत धरणाच्या एका बाजूस पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी एक सांडवा योजला होता व दुसरीकडे धरणाच्या पोटात नालाकृती बोगद्याच्या रूपात दरवाजा असलेले एक बहिर्द्वार योजण्यात आले होते. बहिर्द्वाराच्या आतल्या तोंडाशी असलेले लोखंडी दार हलवण्यासाठीची यंत्रसामग्री बसवलेला एक मनोरा व मनोर्‍यावर जाण्यासाठी बांधापासून एक पूल, अशी व्यवस्था आराखड्यात होती. परंतु यांतील बऱ्याच गोष्टी इ.स. १९६१ च्या जूनअखेरीसदेखील पूर्ण झाल्या नव्ह्त्या. बहिर्द्वार नलिकेच्या वरच्या भागातील माती पुरेशी दाबली नसल्यामुळे तो भाग कच्चा राहिला होता. बहिर्द्वार नलिकेच्या तोंडाशी लावलेला दरवाजाही अर्धवट स्थितीत लोंबकळत ठेवलेला होता. पूरपातळीनुसार हा दरवाजा वर-खाली करायची व्यवस्था झालेली नव्हती. जून महिन्यात भरपूर पाऊस झाल्यामुळे जूनअखेरीस सर्व कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पर्जन्यवृष्टीमुळे जलाशय मात्र भरू लागला होता.