कर्जत तालुक्याच्या कोविड सेंटर मध्ये एकमेव व्हेंटिलेटर...

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कर्जत तालुक्याच्या कोविड सेंटर मध्ये एकमेव व्हेंटिलेटर...


 


कर्जत :- कोरोना रुग्णांना बाहेर जाण्याची सूचना


वीज पुरवठा खंडित झाला तर होतो अंधार,जनरेटर ची आवश्यकता


कर्जत,ता.14 गणेश पवार


                        कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 300चा आकडा गाठायला गेली आहे.त्यात येथील एकमेव कोविड केअर सेंटर मध्ये सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांना तेथे पोहचल्यानंतर अन्यत्र हलवण्याची सूचना केली जात आहे.दरम्यान,एकमेव व्हेंटिलेटर असलेल्या रायगड हॉस्पिटल मधील शासनाच्या कोविड केअर सेंटर मध्ये सुविधांची अनास्था असून ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी धोकादायक अशीच आहे.


                रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून कर्जत तालुक्यासाठी खासगी रुग्णालय असलेल्या रायगड हॉस्पिटलला 6 जुलै 2020 रोजी कोविड केअर सेंटर चा दर्जा देण्यात आला.या रुग्णालयात शासनाने 100 बेड चे कोविड केअर सेंटर सुरु केले असून या हॉस्पिटल मधील अन्य भागात रायगड हॉस्पिटल प्रशासनाने स्वतःचे खासगी डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू केले आहे.कर्जत तालुक्यातील सर्वपक्षीय समितीने समिती अध्यक्ष आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली 5 जुलै रोजी प्रशासनाकडे कोविड हॉस्पिटलची मागणी केली होती.राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू केले.त्या ठिकाणी शासनाने 100 बेड ची व्यवस्था तेथील एका मजल्यावर केली आहे,त्यासाठी सर्व रुग्णांसाठी आवश्यक असलेली ऑक्सिजन पाईपलाईन सर्व बेडच्या आजूबाजूला फिरवून घेतली,पण 7 जुलै रोजी कडाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रायगड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आला,त्यावेळी त्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे होते.परिणामी त्या रुग्णांना पुन्हा पनवेल येथे नेण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती.


                मागील काही दिवस सतत कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठी आहे.ही वाढती संख्या लक्षात घेता कर्जत तालुक्यातील एकमेव कोविड केअर सेंटर असलेले रायगड हॉस्पिटल हे आता डिक्सळ येथील ग्रामस्थांकडे सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक मदतीसाठी जात आहेत.रायगड हॉस्पिटलमध्ये असलेले एकमेव व्हेंटिलेटर हे शासनाच्या मालकीचे नाही,त्यामुळे शासनाने आपल्या कोविड रुग्णांसाठी व्हेंटिलेटर कधी उपलब्ध करून देणार?असा प्रश्न डिक्सळ गावातील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी युवक चे कर्जत तालुका अध्यक्ष सागर शेळके यांनी उपस्थित केला आहे.रायगड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर हे शासनाचे नसल्याने प्रशासनाने उभारलेले विना व्हेंटिलेटरचे कोविड रुग्णालय काय कामाचे?असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.त्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयात असलेले व्हेंटिलेटर मशीन शासनाने तात्काळ रायगड हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटर साठी हलवण्याची मागणी देखील पुढे येत आहे.याबाबत आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता फोन वर बोलणे झाले नाही.