सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ: सर्वेक्षण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


~ नॉन मेट्रो शहरांतून ६६ टक्के तर मेट्रो शहरांतून ३४ टक्के मागणी ~


 


मुंबई, १७ जुलै २०२०: कोरोना व्हायरस उद्रेकाचा सर्वाधिक फटका देशातील खाजगी क्षेत्रातील नोकरदारांना बसला असून अनेकांना आपल्या नोक-या गमवाव्या लागल्या आहेत तर काहींना कमी पगारात आपले घर चालवावे लागत आहे. परिस्थितीत अजूनही विशेष सुधारणा न झाल्याने असंख्य कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार कायम आहे. परिणामी नोकरीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारी नोकरीच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे अड्डा२४७ या देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान सक्षम शिक्षण मंचाने 'महामारीच्या काळात सरकारी नोक-याची स्थिती' जाणून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणात सामील सुमारे ६५०० नोकरी इच्छूक उमेदवारांपैकी ८२.३३ टक्के उमेदवारांनी खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी करण्याला आपले प्राधान्य असल्याचे नमूद केले.


 


सरकारी नोकरीची सर्वाधिक मागणीही नॉन मेट्रो शहरांतून होत आहे. चांगली नोकरी मिळण्याच्या आशेने नॉन मेट्रो शहरातील लोक हे नेहमीच महानगरांत स्थलांतरण करीत असतात. परंतु बहुतांश नोकरदार कोरोनाच्या प्रभावानंतर आपल्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळेच या भागांतून सर्वाधिक म्हणजेच ६६ टक्के मागणी होत आहे तर मेट्रो शहरांतून ३४ टक्के लोकांनी सरकारी नोकरीला प्राधान्य दिले आहे. दिल्लीत सरकारी नोकरीची सर्वाधिक मागणी ११.०४% इतकी नोंदवली गेली तर पाटण्यासारख्या नॉनमेट्रो शहरातूनदेखील ११.०३% इतकी मागणी नोंदवली गेली.


 


सर्वेक्षणात सामील ८२.३३ टक्के लोकांनी सुरक्षितता म्हणून सरकारी नोकरीला प्राधान्य दिले आहे तर ५ टक्के लोकांनी सरकारी नोकरीत मिळणारा पगार तर २.७७ टक्के लोकांनी या नोकरीत मिळणारे इतर लाभ मिळण्याच्या आशेने आपला कल दर्शविला आहे.


 


 


 


अड्डा२४७चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागर म्हणाले “लॉकडाउननंतर ज्या घटना घडल्या अशा विविध घडामोडींचे मूल्यांकन करणे हा या सर्वसमावेशक संशोधनाचा मुख्य हेतू होता. विविध व्यवसायांची सेवा आणि संचालन बंद झाल्याने कामगार वर्गात कधीही नोकरी जाईल अशी भीती निर्माण झाली आहे आणि म्हणूनच सरकारी नोकरीच्या मागणीतील वाढ दिसून आली आहे. खाजगी क्षेत्रात काम करताना संकटसमयी नोकरी जाण्याची असलेली भीती आणि अशा परिस्थितीही सरकारी नोकरीत मिळणारी सुरक्षितता हेच मूळ कारण आहे ज्यामुळे आज बहुतांश लोक सरकारी नोकरीकडे पुन्हा वाळू लागले आहेत."