महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने दीड लाख गरजूंना मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


-


महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात मदतकार्य


 


पुणे : महा एनजीओ फेडरेनच्या वतीने महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातील दीड लाख लोकांना मदत करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या कठिण परिस्थितीत गरीब व गरजू लोकांसाठी तसेच आरोग्य, नगरपालिका आणि पोलीस कर्मचाºयांना मदत करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. याकाळात तब्बल ७५ हजार अन्नाची पाकीटे, २० हजार शिधा संच, २० हजार मास्क, ५ हजार फेस शिल्ड, ६५० पीपीई कीट देण्यात आले. 


 


आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा आणि महा एनजीओ फेडरेनच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली १ हजार ५०० स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यासाठी काम करीत आहेत. पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदीवासी भागांचा यामध्ये समावेश आहे. महा एनजीओ फेडरेनने राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यात ५०० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. 


 


स्वयंसेवकांपैकी शशांक ओंबासे यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले. तसेच फेडरेशनच्या समितीतील विजय वरुडकर, राहुल पाटील, मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, वैभव मोगरेकर, भाग्यश्री साठे, गणेश बकाले, अक्षय महाराज भोसले आदींनी विशेष परिश्रम घेतले. 


 


शेखर मुंदडा म्हणाले, ग्रामीण भागातील गरजू, बेघर, देवदासी, ज्येष्ठ नागरिक, वर्तमानपत्र वाटणारी मुले, दिव्यांग, विद्यार्थी, आरोग्य आणि पोलीस कर्मचारी यांना मदत देण्यात आली आहे. या काळात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड, अनुराधा देशमुख, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर, प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या शिवानी दीदी, आर्ट आॅफ लिव्हींगचे शिक्षक ऋषी नित्यप्रग्या आणि दर्शक हाथी यांचा समावेश आहे. महा एनजीओ फेडरेशन रोजगार हमी योजने अंतर्गत एक लाख रोजगार निर्मितीसाठी सरकारला सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


 


*फोटो ओळ : महा एनजीओ फेडरेशनच्या पुढाकारातून आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील २० जिल्हयात मदतकार्य सुरु आहे. तब्बल दीड लाख लोकांना या माध्यमातून मदत करण्यात आली आहे.