पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**
स्मार्ट सिटीच्या ‘पुणे टेलिमेडिसीन अॅप’वर वैद्यकीय सेवांशी व्हा कनेक्ट
पुणे : सौम्य लक्षणे असलेल्या करोनाबाधित व्यक्तींचे मार्गदर्शक सूचनांनुसार गृह विलगीकरण करून त्यांना घरीच उपचार देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. या व्यक्तींना आरोग्यविषयक कोणतीही शंका असल्यास किंवा वैद्यकीय सल्ला हवा असल्यास ते आता तज्ञ डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधून शकतात. पुणे स्मार्ट सिटीने रुग्णालय व्यवस्थापन एकात्मिक प्रणाली (HMIS) अंतर्गत ‘पुणे टेलिमेडिसीन- आरोग्य धीर’ हे मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे.
‘पुणे टेलिमेडिसीन- आरोग्य धीर’ या अॅपवरून थेट डॉक्टरांशी संवाद साधता येणार आहे. तसेच, संवाद साधल्यानंतर आपल्या सर्व वैद्यकीय नोंदी, डॉक्टरांची टिप्पणी व अहवाल अॅपवर एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. करोनाबाधित प्रत्यक्ष बाहेर जावे लागू नये यासाठी एक प्रकारे दृकश्राव्य स्वरुपातील ही व्हिडिओ ओपीडी सुविधा उपलब्ध झाली आहे. शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) पाळून नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या पथदर्शी उपक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल, व इतर मान्यवर उपस्थित होते.
https://tinyurl.com/y4hahkue या लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पुणेकर नागरिकांनी प्ले स्टोअरमधून ‘पुणे टेलिमेडिसीन- आरोग्य धीर’ हे अॅप डाऊनलोड करावे. यामध्ये विविध सेवा सुविधांचे पर्याय देण्यात आले आहेत. आपणास आवश्यक असणाऱ्या सुविधेचा पर्याय निवडून संबंधित आरोग्य सेवेचा लभा घ्यावा, असे आवाहन महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, आयुक्त श्री. विक्रम कुमार व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत रुग्णालय व्यवस्थापन एकात्मिक प्रणाली (HMIS) या एका महत्त्वाच्या प्रकल्प पुणे स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांशी नागरिकांना जोडणे हा यामागील उद्देश आहे. या प्रकल्पाअंतर्गत हे अॅप विकसित केले असून, करोनाच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधा कोणत्या आहेत याबाबतची माहिती येथे उपलब्ध करण्यात येणार आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सर्वसामान्यांसाठी सुलभ व उपयुक्त असे हे मोबाईल अॅप आहे. यामुळे आरोग्य सुविधेत भर पडणार असून, शहरातील करोनाच्या संकटाला तोंड देताना, तसेच संसर्ग रोखण्यासाठी हे मोबाईल अॅप साह्यभूत ठरणार आहे.”
पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल म्हणाल्या, “करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सध्या करोनाबाधित रुग्णांसाठी सेवा देण्यावर भर आहे. तसेच, पुढील काळात याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढवून लवकरच इतर रुग्णांसाठीही अनेक सेवा उपलब्ध केल्या जातील. डॉक्टरांची वेळ घेणे, सल्ला घेणे यासह विविध सेवा घरबसल्या या मोबाईल अॅपवरून देण्यात येणार आहेत.”
या लिंकवर जाऊन किंवा खालील क्यूआर कोड स्कॅन करून हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा.
https://tinyurl.com/y4hahkue