पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*रुग्णांच्या मृत्युच्या कारणांचे सखोल परीक्षण करुन रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणावा-केंद्रीय पथक प्रमुख कुणाल कुमार*
पुणे दि. 28:- पुण्यातील प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून यापुढे रुग्णांना जलद गतीने व प्रतिसादात्मक उपचार दिले जावेत. तसेच रुग्णांच्या मृत्युच्या कारणांचे अधिक सखोल परीक्षण करण्यात येऊन रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी सूचना केल्या.
केंद्रीय पथक प्रमुख कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पुणे शहर व परिसरातील कोविड परिस्थिती व उपाययोजना या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस केंद्रीय पथकामधील सदस्य अरविंद कुशवाह आणि डॉ. सिमीकांता बॅनर्जी उपस्थित होत्या. त्याचबरोबर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल तसेच महानगरपालिका व शहरामधील प्रमुख रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देवून यांच्यावरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच सर्व रुग्णालयांमध्ये सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसवावे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार रुग्णांना उपचार करावे, रुग्णांना मानसिक उपचार देणे तसेच लक्षणे नसणा-या रुग्णांना गृह विलगीकरण करीता प्रवृत्त करण्याबरोबरच मृत्यूदर शुन्यावर आणण्याकरीता प्रयत्न करावेत, अशा सूचनाही दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी प्रशासन व आरोग्य यंत्रणा ह्या चांगले काम करत असून त्यांनी आपली बांधिलकी जपली आहे. शासनाने सर्व आरोग्य कर्मचा-यांना विमा योजना लागू केलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य कल्याण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला (वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह) दिला जात आहे. तसेच शासनाच्या सुचनेनूसार सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसविण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी या समस्यांबाबत शहरामधील मेडीकल असोसिएशनबरोबर बैठका घेऊन निर्णय घेण्यात आलेले आहेत. प्रशासनाची भूमिका स्पष्ट असून प्रत्येक व्यक्तीचे प्राण वाचले पाहिजेत. तसेच पुढील 45 दिवस आपणा सर्वांना संकटकालीन योद्धा म्हणून काम करावयाचे आहे याची जाणीव ठेवून काम करावे, असे सांगितले.
बैठकी दरम्यान शहरामधील प्रमुख रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना येणा-या विविध समस्या मांडल्या.****