पुणे प्रवाह न्युज पोर्टल
* जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
पुणे, दि. 9: पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, अपर जिल्हाधिकारी तथा कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेले समन्वय अधिकारी सुरेश जाधव, उपजिल्हाधिकारी अनुक्रमे सुधीर जोशी, आरती भोसले, सुभाष भागडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रमोद केंभावी, तहसीलदार अनुक्रमे सुनील कोळी, रोहिणी आखाडे-फडतरे, राधिका बारटक्के व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, पुणे जिल्ह्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे.
छावणी परिषद, हवेली तालुका तसेच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी विशेष लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या भागात कंटेन्मेंट झोन तयार करा, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध व तपासणी प्रभावीपणे करा. कोरोना तपासणी अहवाल लॅब कडून 24 तासात मिळण्यासाठी प्रयत्न करा. शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती घेवून हा अहवाल नियंत्रण कक्षाला वेळोवेळी कळवा. रुग्णांना बेड जलदगतीने मिळवून देण्यासाठी नियोजन करा. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित इंसिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी यांच्या समन्वयाने आवश्यक त्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवा. उपाययोजना राबविताना गावातील उद्योग आस्थापनांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव तसेच उपस्थित समन्वय अधिकाऱ्यांनी आवश्यक ती माहिती दिली.
0000