कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे* विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे*


विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन


  पुणे विभागासाठी प्लाझ्मा दान सुविधेसाठी वेगळे ॲप


पुणे दि.29: कोवीड – 19 वर आजतागायत कुठलेही रामबाण औषध निघाले नसले तरी कोवीडबाधित रुग्णांचा 28 दिवसानंतर ती व्यक्ती कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुस-या बाधित रुग्णाला देता येतो.कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते त्यामुळे कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.


विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, प्लाइमा ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. प्लाझ्मा दान करणारी व्यक्ती 18 ते 60 वयोगटातील कुठलीही व्यक्ती ज्या व्यक्तीचे वजन 50 किलो पेक्षा जास्त आहे तसेच हिमोग्लोबीन 12.5 पेक्षा जास्त आहे, अशी व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. आपण किंवा आपल्या परिचित व्यक्ती ज्यांना कोवीड होता, त्यातून ते बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा दानमुळे कोणताही धोका त्या व्यक्तीला पोहचत नाही, प्लाझ्मा दानमुळे दोन व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे आपण किंवा आपल्या परिचित व्यक्तीला प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करावे. असे आवाहनही त्यांनी केले.


पुणे विभागासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी वेगळे ॲप तयार करण्यात येत आहे. त्या ॲपमध्ये प्लाझ्मा दान करण्यासाठी आपली नोंद करू शकतात. त्याबरोबर आपल्याला किंवा आपल्या परिचित व्यक्तीला प्लाझ्माची गरज भासल्यास प्लाझ्माची मागणी करू शकतात, प्लाझ्मा दान रक्तदानासारखेच आहे, हे अमुल्य दान आहे. म्हणून कोरोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यास पात्र असल्यास प्लाझ्मा दान करुन गंभीर करोना रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.