तरुणाच्या अपघातास कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मानवाधिकार आयोगाने केली आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


नेरळ-कळंब रस्त्यावरील काँक्रीटीकरण कधी होणार?अर्धवट रस्त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग गप्प?


कर्जत,ता.16 गणेश पवार


                           कर्जत तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी मंजूर असलेले काम ठेकेदार कंपनीने केले नाही.त्यामुळे रस्त्यात खड्डे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत आणि तेथे मंजूर असलेली काँक्रीटीकरण कामे न करणाऱ्या ठेकेदारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान,रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असून खड्डे चुकविताना वाकस गावातील दुचाकीस्वराच्या पायाचे तुकडे झाले असून त्या


                         माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर मुंबई-पुणे मध्य रेल्वेचे नेरळ पाडा येथील गेट पासून कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याच्या पोही फाटा या भागातील रस्त्याचे डांबरीकरण आणि काही भागात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी सव्वा चार कोटी रुपये राज्य शासनाने अर्थसंकल्प 2016 मध्ये मंजूर केले होते.त्या निधीमधून 7 किलोमीटर लांबीचा रस्ता डांबरीकरण करणे तसेच साईमंदिर नाका येथील 200 मीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाबरोबर गणेश स्वीट मार्ट पासून रेल्वे फाटक या 500 मीटर लांबीच्या भागातील रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटकरण ही कामे करण्यात येणार होती.मात्र ठेकेदाराने त्या रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण केले असून सिमेंट काँक्रीटीकरण तसेच रुंदीकरण कामे दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यातील नेरळ रेल्वे फाटक ते गणेश स्वीट मार्ट म्हणजे रेल्वे स्टेशन रोड पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण तसेच सिमेंट काँक्रीटकरणाचे काम ठेकेदाराने अद्याप सुरू केले नाही.त्या भागातील रस्ता अरुंद असल्याने तेथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.ही बाब अनेकदा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लक्षात आणून देण्यात आली,मात्र बांधकाम विभाग देखील त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.


                            दुसरीकडे सर्वाधिक गर्दी ज्या भागात होत असते,त्या साईमंदिर चौकात एकाच वेळी सहा रस्ते येऊन मिळतात आणि त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होत असते.त्याचवेळी त्या भागात असलेली दुकाने लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वर्दळ असते,त्यात तेथील सर्व भागात रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.त्या खड्ड्यात दररोज वाहने एकमेकांना धडकत असतात.दोन दिवसांपूर्वी वाकस येथील एका 22 वर्षीय तरुणाच्या दुचाकीला खड्डे चुकविताना अपघात झाला आहे.त्यात त्या तरुणाच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत.मात्र अशा अपघातांना जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मानवाधिकार आयोगाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मोरगे यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने माथेरान-नेरळ-कळंब रस्त्यावर पडलेले खड्डे न भरल्याने अपघात होत आहेत.तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विजय हजारे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावर रस्त्याचे मंजूर असलेले काम वेळेत पूर्ण केले नसल्याने राज्य सरकारच्या पोर्टल वर तक्रार करून ठपका ठेवला आहे.तेथील 200 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम शासनाने सिमेंट काँक्रीटकरण म्हणून मंजूर केले आहे.मात्र दोन वर्षे झाली तरी रस्त्याचे काम ठेकेदार करीत नाही.ही बाब तेथे रस्त्यात खड्डे पडण्यास आणि अपघात होण्यास कारणीभूत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.शासनाने अशा ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.ठेकेदारांच्या चुकीमुळे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदार कंपनीला पाठीशी घालत असल्याने रस्त्याचे काम अर्धवट आहे,ते पूर्ण करण्यात हयगय करणार्यांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी विजय हजारे यांनी केली आहे.त्यानुसार किमान खड्डे भरण्याची कामे सुरू झाली आहेत.परंतु काँक्रीटकरण कामाचे काय?असा प्रश्न आहे.


 


अजयकुमार सर्वगोड-उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग


रस्त्याचे काम घेणारी कंपनी यांनी रस्त्याच्या कामातील डांबरीकरण काम पूर्ण केले आहे,मात्र रुंदीकरण आणि काँक्रीटकरणांची कामे केली नाहीत.त्याबद्दल त्यांना आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करून तंबी देत आहोत,मात्र ठेकेदार कंपनी आता रस्त्याचे काम करीत नाही.मात्र रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत.