माथेरानचा जगाशी संपर्क तुटला वीज आणि दूरध्वनी बंद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


माथेरानचा जगाशी संपर्क तुटला वीज आणि दूरध्वनी बंद 5                        पर्यटन व्यवसाय बंद असलेल्या माथेरान या पर्यटन स्थळावर राहणारे नागरिक हे आर्थिक संकटात आहेत.त्यात निसर्ग वादळाने माथेरान करांवरील संकटात आणखी भर घातली असून 3 जून च्या दुपार पासून माथेरान आऊट ऑफ रेंज मध्ये गेले आहे. दरम्यान,शेकडो झाडे तुटली असल्याने माथेरान ला होणारा वीज पुरवठा खंडित आहे तर माथेरान मधील दूरध्वनी व्यवस्था देखील बंद पडली आहे.तर घाटरस्ता देखील झाडे रस्त्यावर पडल्याने बंद आहे. त्यामुळे माथेरान मधील नागरिकांचा जगाशी संपर्क तुटला आहे,अशी परिस्थिती 2005 मध्ये पावसाळ्यात आली होती.                         निसर्ग चक्रीवादळ यामुळे डोंगरावर वसलेल्या आणि पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.माथेरान मध्ये कालच्या वादळात शेकडो झाडे उन्मळून पडली असून त्याचवेळी काही झाडे घरांवर पडली असून त्या घरांचे नुकसान झाले आहे.3 जून रोजी दुपारी आलेल्या चक्री वादळाने माथेरान मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.माथेरान गावात जागोजागी झाडे कोसळली असून त्यामुळे रस्त्याने चालणे देखील कठीण होऊन बसले आहे.त्यात झाडे ही घरांवर कोसळली असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.माथेरान मध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या दस्तुरी नाक्या पासून शेवटचे टोक असलेल्या वन ट्री हिल पर्यंत सर्व भागात झाडे कोसळली आहेत.शहरातील सर्व रस्त्यांवर झाडे असून किमाम 10 हजार झाडे कालच्या निसर्ग चक्रीवादळात तुटून गेली आहेत तर काही जमिनी पासून मुळासकट कोसळली आहेत.                        माथेरान मध्ये जाणारा एकमेव मार्ग असलेल्या नेरळ-माथेरान घाट रस्त्यात वॉटर पाईप पासून दस्तुरी नाका पर्यंतच्या रस्त्यावर सर्व भागात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याने घाट रस्ता बंद होता.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्त्यातील झाडे जेसीबी मशीनच्या साहाय्याने बाजूला केली असून दुपार पासून घाट रस्ता मोकळा झाला आहे.परंतु माथेरान गावातील सर्व रस्त्यांवर पडलेली झाडे ही बाजूला करण्यासाठी कोणत्याही मशीन चे साहाय्य घेतले जाणार नसल्याने माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांच्याकडे असलेला आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी यांना पालिकेने रस्त्यावरील झाडे बाजूला करण्यासाठी कामाला लावले आहे. नगरपरिषद प्रशासनाने 90 कामगार झाडे बाजूला करण्याचे कामी लावली असून शासनाने विशेष बाब म्हणून जेसीबी मशीन माथेरान मध्ये नेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांना केली आहे.                         शहरात सर्वत्र झाडे आणि झाडांच्या फांद्या पडलेल्या असल्याने वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे.माथेरान मधील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्या या भूमिगत असल्याने वीज वाहिन्यांचे नुकसान झाले नाही.परंतु शहरातील 15 घरांची पत्रे उडून गेली आहेत,तर 17 घरांवर, इमारतींवर पाणी साठवून ठेवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सिंटेक्स टाक्या खाली कोसळून त्यांचे नुकसान झाले आहे.तर घरांवरून उडालेली पत्रे आणि घरांवर कोसळलेली झाडे ही घरात जाणाऱ्या वीज वाहिन्या यांच्यावर कोसळल्या असल्याने वीज पुरवठा 3मे रोजी दुपारी खंडित झाला होता.वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील दूरध्वनी व्यवस्था देखील कोलमडून गेली आहे.काल दुपार पासून वीज आणि दूरध्वनी व्यवस्था बंद असून त्यामुळे माथेरान चा जगाशी संपर्क तुटला आहे.वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरात आज पाणी पुरवठा देखील होऊ शकला नाही.                         महावितरण कंपनी ने आपली सर्व यंत्रणा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी लावली असून चार वाजता म्हणजे 26 तासांनी माथेरान चे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथील वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.आज रात्री पर्यंत शहरातील वीज पुरवठा सुळलीत होईल अशी माहिती महावितरण चे शाखा अभियंता लोभी यांनी दिली आहे. फोटो ओळ  पोलीस रस्ता मोकळा करताना