चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे... - सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे


                               - सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी


 


   पुणे दि.2:- महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 3 व 4 जून रोजी "निसर्ग"या चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्यामुळे जुन्नर व आंबेगाव हे तालूके दक्षता (अलर्ट) या क्षेत्रात येत आहेत. तरी याबाबत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत उपाययोजना करुन संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे, अशा सूचना जुन्नर- आंबेगाव उप विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.


  याबाबत जुन्नर- आंबेगाव उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्याच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते बैठकीस तालुक्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.


   श्री.डुडी म्हणाले, "निसर्ग"या चक्रीवादळाचा तडाखा व अतिवृष्टीपासून संभाव्य बाधित कुटूंबांचे स्थलांतर करताना कोरोना(कोविड-19) या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे व मुबई तसेच इतर ठिकाणावरून आलेल्या लोकांचे विलगीकरणाबाबत खबरदारी घेवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तसेच स्थलांतर करताना कोरोना(कोविड-19) या आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवावे. या कालावधीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ यांनी डोंगराळ भागातील गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्तीसाठी व समन्वयासाठी पथकांची व वाहनांची नेमणूक करावी. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संभाव्य धोक्याची ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी शासकीय व खाजगी जे.सी.बी उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच त्यांचा संपर्क क्रमांक स्थानिक प्राधिकरणास देण्यात यावा.


  वनविभागाने संभाव्य धोकादायक ठिकाणी पथके नेमून कोरोना(कोविड-19) या आजाराच्या पार्श्वभूमीवर इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवून उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून तात्काळ कार्यवाही करावी. दिनांक 3 व 4 जून 2020 रोजी "निसर्ग"या चक्रीवादळाच्या व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व लोकांनी सुरक्षितपणे घरातच थांबा, या कालावधीत भूस्खलन होण्याची व महापूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष खबरदारी घ्यावी व घराबाहेर पडू नये, असेही आवाहन श्री.डुडी यांनी केले आहे.


००००