गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा *ग्रामीण भागांमध्ये आरोग्य तपासणी मोहीम अधिक व्यापकपणे राबवा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


                                                                           - गृहमंत्री अनिल देशमुख


          पुणे,दि.7: भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करावे, असे सांगतानाच ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी आरोग्य तपासणी मोहीम अधिक व्यापकपणे राबवावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.


पुणे येथील विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री विश्वजित कदम, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. कोरोनाला रोखण्यासाठीचा सर्व यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्वाचा असून हाच उत्तम समन्वय राज्यभरातील सर्व यंत्रणेत दिसतो आहे, असे सांगून कोरोना काळात पुणे पोलीसांची कामगिरी अत्यंत समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.


महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्याचे निर्देश देत गृहमंत्री देशमुख म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्व नागरिकांना कोरोनासह इतर आजाराला आर्थिक सहाय्य मिळणार असून त्याचा लाभ सामान्यातील सामान्य नागरिकांना व्हावा यासाठी जनजागृती करावी, तसेच नागरिकांनी या योजनेचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासन समन्वयाने काम करत असल्याचे सांगून गृहमंत्री देशमुख म्हणाले, पुणे प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी हॉस्पीटलमधील बेड उपलब्धतेचा डॅशबोर्ड प्रयोग तसेच इतर नावीण्यपूर्ण प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहेत. पुण्यातील हेच नावीण्यपूर्ण प्रयोग राज्यातील इतर जिल्हयात राबविण्यात येणार असल्याचे सांगतानाच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी वाढविण्यात यावी. पल्स ऑक्सीमीटरचा वापर करण्यात यावा. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधाबाबत कायम आढावा घेण्यात यावा जेणेकरून नागरिकांना गावातच उपचार मिळणे शक्य होईल, असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.       


          विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. रुग्णालयातील बेडच्या उपलब्धतेची माहिती या डॅशबोर्डवर वेळोवेळी अद्ययावत करण्याच्या सूचना विभागातील रुग्णालय प्रशासन व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. ही माहिती रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या संस्थांनाही देण्यात येणार आहे, जेणेकरुन बेड उपलब्ध असणाऱ्या नजीकच्या रुग्णालयात रुग्णाला जलदगतीने दाखल करणे शक्य होईल. यामुळे प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही या डॅशबोर्ड सुविधेचा निश्चितच उपयोग होईल. पुणे शहरासह सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली.


  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.