डॉक्टरांच्या पाठीशी ग्रामपंचायत उभी राहणार-सरपंच

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


डॉक्टर आणि ग्रामपंचायत यांच्यात बैठक


 


कर्जत,ता.24 गणेश पवार


 


                          कर्जत तालुक्यातील नेरळ गाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.अशावेळी जनतेतून खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टर यांच्याकडून सातत्याने आक्षेप घेतला जात आहे,मात्र नेरळ ग्रामपंचायत 100 टक्के डॉक्टर मंडळींच्या पाठीशी आहे अशी ग्वाही नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांनी दिली.


 


                          नेरळ मधील काही खासगी डॉक्टर हे रुग्णांची तपासणी करताना त्यांच्या नोंदी ठेवत नसल्याबद्दल मागील काही दिवस सातत्याने चर्चा सुरू आहे.त्यामुळे कर्जत मेडिकल असोसिएशन आणि नेरळ ग्रामपंचायत यांनी एका बैठकीचे आयोजन पाहुणचार हॉटेल येथे केले होते.त्यावेळी नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा तसेच कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे,कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज बनसोडे,नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मंगेश धादवड आदीसह कर्जत मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ एस इ कुलकर्णी, सहचिटणीस डॉ जयश्री देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते. कोरोना ची वाढती संख्या आणि त्यावर मात करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना यांच्यावर चर्चा प्रामुख्याने करण्यात आली.त्यानंतर कर्जत मेडिकल असोसिएशनकडून नेरळ मधील काही खासगी डॉक्टर यांच्याबाबत नेरळ मध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे,त्यावर अध्यक्षा डॉ कुलकर्णी यांनी आपले मत मांडत सर्व खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टर यांना त्यात समाविष्ट केले जात असल्याची खंत बोलून दाखवली.त्याचवेळी नेरळ मधील अनेकांच्या तक्रारी असलेले डॉक्टर हे कर्जत मेडिकल असोसिएशनचे सदस्य नाहीत असे सांगितले.मात्र ते सदस्य नसले तरी स्वतःच्या जबाबदारीवर व्यवसाय करू शकतात असे मत मांडले.त्यावर कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोरे यांनी तालुक्यातील बोगस डॉक्टरांची नावे आमच्याकडे आहेत,आम्ही कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांना पत्र दिले आहे.परंतु आता या कोरोना संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन जनतेला स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी सर्वांनी उचलली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.तर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बनसोडे यांनी प्रशासन आणि माध्यमे यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे मत मांडत स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून रिस्क घेवून सेवा देणाऱ्या डॉक्टर यांच्या पाठीशी उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त केली.


 


                            त्यावेळी कर्जत मेडिकल असोसिएशनचे जेष्ठ सदस्य डॉ हेमंत गंगोलिया यांनी मोबाईल मधील एसएमएस प्रमाणे काम करण्याचे आवाहन करीत सोशल डिस्टनसिंग पाळला पाहिजे,तोंडावर मास्क लावला पाहिजे आणि कायम सॅनिटाइझरचा वापर केला पाहिजे अशी त्रिसूत्री यावेळी सांगितली.या बैठकीत नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य प्रथमेश मोरे,कर्जत मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ गणेश साळुंखे,तसेच माजी पदाधिकारी डॉ आशिष कर्वे यांनी आपली मते मांडली.शेवटी बोलताना नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांनी नेरळ ग्रामपंचायतने पहिल्या दिवसापासून कोरोना पासून बचाव करण्यासाठी उपाययोजना यांचा अवलंब केला आहे.नेरळ ग्रामपंचायत, खासगी सेवा देणारे डॉक्टर,नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पत्रकार तसेच नेरळ मधील जनता ही एकत्र येऊन कर्फ्यु पाळून कोरोना ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अशावेळी अनेकदा खासगी डॉक्टर यांच्याबद्दल सातत्याने तक्रारी येत होत्या.आम्ही कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार नाही,परन्तु आपली जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणारे खासगी डॉक्टर यांच्या पाठीशी नेरळ ग्रामपंचायत आहे.त्यांना सुरक्षा देणे आणि त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करण्याचा प्रयत्न नेरळ ग्रामपंचायत कडून होणार नाही असे आश्वासन सरपंच शिंगवा यांनी दिले.कोरोना वर मात करण्यासाठी कर्जत मेडिकल असोसिएशनने एकदा उपक्रम हाती घ्यावा त्याला आम्ही ग्रामपंचायत सक्रिय सहभाग घेऊन साथ देऊ असे आश्वासन देखील सरपंच शिंगवा यांनी यावेळी दिले.बैठकील नेरळ मधील 40 हुन अधिक खासगी सेवा देणारे डॉक्टर उपस्थित होते.


 


 


 


 


 


 


फोटो ओळ 


 


कर्जत मेडिकल असोसिएशन आणि नेरळ ग्रामपंचायत यांची बैठक


 


छायः गणेश पवार