पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून वादळ ग्रस्त घरांची पाहणी

कर्जत,ता.4 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील पूर्व भागात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने घरांचे तसेच जिल्हा परिषद शाळांचे नुकसान झाले होते.वादळ झाल्यानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला पंचनामे करण्याची सूचना केली होती. त्यांनतर 3 मे रोजी आमदार थोरवे यांनी वादळ ग्रस्त भागाची पाहणी केली असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांना पत्र पाठवून केली आहे.
कर्जत तालुक्यात 29 आणि 30 एप्रिल रोजी वादळ आले होते आणि त्यानंतर अवेळी पाऊस देखील झाला होता.त्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तालुक्यातील कशेळे,पाथरज, जांबरुंग,रजपे,कडाव,सावळे आणि वाकस ग्रामपंचायत मधील घरांचे,झाडांचे आणि काही ठिकाणी शाळेच्या इमारतींचे नुकसान केले होते.वादळ झाल्यानंतर कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करण्याची सूचना रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.त्यानंतर 1 मे रोजी आमदार थोरवे यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र पाठवून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली होती.त्यानंतर कर्जत तहसील कार्यालय आणि खालापूर तहसील कार्यालय यांच्याकडून तात्काळ आपल्या तलाठी यांच्याकडून पंचनामे करून घेतले आहेत.कर्जत तालुक्यात 7 ग्रामपंचायत हद्दीत 1153 शेतकरी यांच्या घरांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले असून सर्व पंचनामे पूर्ण झाले आहेत.
कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी 1 मे रोजी वादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यावेळी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख,शिवसेना तालुका प्रमुख उत्तम कोळंबे तसेच जेष्ठ कार्यकर्ते रमेश मते आदी उपस्थित होते.