एक अशीही लव्हस्टोरी :- 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


एक अशीही लव्हस्टोरी :-


आणि फायनली आज पेठे आजी आजोबा त्यांच्या गावी जायला निघाले.......
दुर्दैवांची साखळी म्हणजेच Series of unfortunates काय असते ती या वृध्द दांपत्याने अनुभवली. ८३ वर्षांचे उस्मानाबाद येथील भागवत पेठे आजोबा त्यांच्या पत्नी अनुसुया पेठे(वय ७८) यांना त्यांच्या ह्र्दयविकारावरील उपचारांसाठी पुण्यात घेउन आले होते. जानेवारी महिन्यात ते एका मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल झाले. आज्जी महिनाभर तिथे ॲडमिट होत्या. या कालावधीत हॉस्पिटलचे बिल खुप जास्त होत होते आणि आजोबांनी काहीही करुन आज्जींना बरे करायचेच असा चंग बांधला असल्यामुळे त्यांनी गावकडील अडीच एकर जमिनीपैकी एक एकर जमीन विकून ते पैसे हॉस्पिटल मध्ये भरले. त्यानंतर हॉस्पिटलने सांगितले की आज्जींचे वय पाहता आता शस्त्रक्रिया करायला नको. आणि लाख्खो रुपयांचे बिल वसूल करुन रुग्णालयाने त्यांना डीसचार्ज दिला.


डिसचार्ज घेउन बाहेर पडल्यानंतर या वृध्द आज्जी आजोबांना कोरोना, लॉकडाऊन, जिल्हाबंदी याबद्दल कळले. आता काहीच घडू शकत नाही आणि आपण आपल्या घरी उस्मानाबादला जाऊ शकत नाही हे कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नुकत्याच डिसचार्ज मिळालेल्या आणि ह्र्दयविकार असलेल्या आपल्या वृध्द पत्नीला घेउन पेठे आजोबा पुण्यात रस्त्यांवर जागा मिळेल तिथे राहू लागले, मिळेल ते खाऊन दिवस काढू लागले. काही दिवस त्यांनी वारजे येथील हायवेच्या पुलाखाली काढले नंतर त्यांना तिथून महानगरपालिकेच्या शेल्टर हाऊस मध्ये हालविण्यात आले. जवळजवळ एक महिना असा इकडे तिकडे काढल्या नंतर त्यांना कोणीतरी सांगितले की स्वारगेट येथून बसेस सुरु झाल्या आहेत. आजोबा आज्जींना घेउन स्वारगेटला गेले. तर तिथून अशा कोणत्याही बसेस नाहीत हे सांगून त्यांना तिथून हाकलण्यात आले. आणि तो ठरला या प्रवासाचा टर्निंग पॉईंट... 


तिथे एक दुसरे वार्तांकन करण्यासाठी गेलेले एबीपी माझाचे वार्ताहर मंदार गोंजारी यांनी या आजी आजोबांना पाहिले आणि त्यांची समस्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांसमोर आणली. मग ही बातमी वंदेमातरम् संघटनेच्या सदस्यांपर्यंत पोहचली. वंदेमातरम् संघटनेने या आजोबांचा नंबर मिळवत त्यांच्याशी संपर्क साधला.. तेंव्हा आजोबा परत वारजे पोलीस स्टेशनच्या बाहेर आश्रय आणि अन्न या अपेक्षेने जाऊन बसले होते. वंदेमातरम् संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथून त्यांना रमणबाग युवा मंचचे सागर बेलदरे यांच्या शौर्य हॉटेल येथे पोहचविले. शौर्य हॉटेल ने या आज्जीआजोबांची राहण्याची आणि जेवणाची केली. तोपर्यंत सध्या उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले व पूर्वी पुण्यात उत्तम कामगिरी करणारे पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड साहेब यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. एकीकडे पुणे जिल्हापरिषदेतील वरिष्ठ अधिकारी संदेश शिर्के साहेब आणि उस्मानाबाद येथून राठोड साहेब यांच्या प्रयत्नातून या आज्जी आजोबांच्या प्रवासी परवानगीचे काम चालू होते. मंदार गोंजारी सर या प्रोसेस मध्ये एक टीम म्हणूनच योगदान देत होते. या प्रवासासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांनी ॲंब्युलंस उपलब्ध करुन दिली. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या परिवाराने डिझेल खर्च उस्फूर्तपणे पाठवून दिला. मध्ये एक मेडीकल सर्टीफिकेट लागत होते त्यासाठी नगरसेवक सचिन दांगट यांनी सहकार्य केले. आणि ज्याची सगळेजण मनापासून वाट पहात होते तो परवानगीचा पास आला.... 


आज सकाळी अतिशय भावनिक वातावरणात या आज्जी आजोबांना निरोप देण्यात आला. या आज्जी आजोबांची गावी गेल्यावर लगेच गैरसोय होऊ नये म्हणून महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य साहित्य त्यांना देण्यात आले. निरोपाच्या वेळी सगळ्यांचेच डोळे भरुन आले होते... पण ते आनंदाश्रू होते... मग जोरदार गणपती बाप्पाचा जयघोष झाला आणि गाडी निघाली... गाडी नजरेआड होइपर्यंत हे आज्जी आजोबा उपस्थितांना खिडकीतून निरोपाचा हात दाखवत होते. या आज्जी आजोबांचा दोन महिन्यांचा वनवास आज संपणार... आज पेठे आज्जी आजोबा उस्मानाबादला त्यांच्या स्वत:च्या घरी पोहचणार.... खरतर एखाद्या चित्रपटाची वाटेल अशी ही लव्हस्टोरी... ८३ वर्षांचा हिरो आणि ७८ ची हिरॉईन...!!!🌹