शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*


         *भावपूर्ण श्रद्धांजली*
    
             दि 4 मे च्या रात्री 12 वा. शांताराम कुंजीर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले.ही घटना अत्यंत दुःखदायक आहे.कारण अत्यंत उमेदीच्या काळात असे घडणे हे सर्वांसाठी धक्कादायक आहे.


              शांताराम कुंजीर म्हणजे संघर्ष!अगदी बालवयापासून त्यांनी संघर्ष केला.अन्याय आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडणे हा त्यांचा पिंड होता.हक्कासाठी लढणे हा त्यांचा स्थायीभाव होता.भीती त्यांना माहीत नव्हती.मराठा समाजातील उपेक्षित वर्गासाठी त्यांनी प्रदीर्घ संघर्ष केला.


           शांताराम कुंजीर आणि प्रवीण गायकवाड म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील धनाजी-संताजीची जोडी! मराठा महासंघाचे आण्णासाहेब पाटील,शशिकांत पवार,बामसेफचे वामन मेश्राम साहेब,मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या सोबत कुंजीर साहेबांनी कार्य केले.सुरुवातीच्या काळात ते शिवसेनेत सक्रिय होते.


                 शांताराम कुंजीर हे वैचारिकदृष्ट्या खूप प्रगल्भ होते.त्यांचे अफाट वाचन होते,ते प्रवाहपतीत नव्हते, त्यामुळेच ते परिवर्तनाच्या लढ्यात उतरले. एका बाजुला सामाजिक लढा तर दुसऱ्या बाजूला जगण्याचा संघर्ष सुरू होता.एका हॉटेलमध्ये मॅनेजर,नंतर तुळशीबागेत दुकान,नंतर हॉटेल सुरू केले.अनेक छोटे मोठे व्यवसाय त्यांनी केले.अपयशाने ते खचून गेले नाहीत.हसत मुखाने संकटाला सामोरे गेले.पण कधी रडगाणे केले नाही.


             मराठा आरक्षणाच्या लढ्यातील शांताराम कुंजीर हे झुंजार नेते होते.त्यासाठी त्यांनी अनेक लढे दिले.मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर फोडले,त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला पण ते मागे हटले नाहीत.आज आरक्षण मिळाले आणि ते गेले.


                छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास विकृत करणाराना त्यांनी धडा शिकवला, तो वैचारिक आणि रस्त्यावरच्या लढाईचा देखील होता. "पती माझे छत्रपती"  या नाटकातून "छत्रपती" शब्दाची विडंबना करणारांना त्यांनी नाटकाचे नावं बदलायला भाग पाडले.भांडारकर प्रकरणात ते शिवाद्रोह्यां विरुद्ध लढले.विकृतांविरुद्ध ते अभ्यासू आणि निर्भीडपणे लढले.


           कार्यकर्त्यांसाठी रात्री अपरात्री धावून जाणे हा त्यांचा पिंड होता.एकदा रात्री वेस्ट ईन हॉटेलसमोर कांही समाजकंटकांनी अडविले,मी कुंजीर साहेबांना फोन केला,दहा मिनिटांत ते आले व कंटक पळून गेले. शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी ते स्वतः पुढे आले,छपाईसाठी त्यांनी मोलाची मदत केली.ते आम्हा सर्वांचा मोठा आधारवड होता.निरपेक्षपणे काम करत राहणे, ही त्यांची खासियत होती.


           अनेक प्रसंगी वडा पाव खाऊन त्यांनी कार्य केले.त्यांना गरिबीची आणि गरिबांची मोठी जाणीव होती.त्यांना कर्तृत्वाची घमेंड नव्हती,अहंकार नव्हता,बडेजाव नव्हता.ते समन्वय करायचे.आपापसातील वाद त्यांना आवडत नव्हते.सर्व वयोगटात ते सहज मिसळायचे. आम्ही त्यांच्यासोबत खूप फिरलो. संघटनेसाठी त्यांनी दुचाकी,रेल्वे,एसटी अशा वाहनातून रात्री अपरात्री उपाशीपोटी राहून खूप प्रवास केला,पण त्याचे त्यांनी कधी भांडवल केले नाही.आता त्यांच्याकडे चारचाकी गाडी आली आणि ते गेले, याचे खूप दुःख वाटते.ते येरवाड्यात राहिले.ते चळवळ जगले.छोट्या घरातून ते आता प्रवीणदादांच्या मदतीने मोठ्या फ्लॅटमध्ये आले आणि ते गेले, याचे खूप दुःख वाटते.
   
          त्यांनी गरिबीचा कधी संकोच बाळगला नाही,कधी भांडवल केले नाही,चांगले दिवस आले तरी आपला लढाऊ बाणा विसरून ते प्रस्थापित झाले नाहीत.त्यांना सर्वांसाठी सतत लढायला आवडायचे.ते कार्यकर्त्यांना खूप जपायचे.आपल्या सहकाऱयांवर खूप प्रेम करायचे.कोणाचा जरी फोन आला तर ते फो घ्यायचे,नाही घेता आला तर परत करायचे.अत्यंत शांतपणे समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्यायचे.पुरोगामी विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही.ते जितके नम्र होते तितकेच ते बाणेदार होते.अशा कर्तृत्ववान कुंजीर साहेबांचा अकाली मृत्यू धक्कादायक आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना खूप दुःख होत आहे                             
                              ---श्रीमंत कोकाटे