कर्जत तालुक्यात आज सात नवीन रुग्ण... कर्जतची वाटचाल रेड झोनकडे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


 


 


कर्जत तालुक्यात आज सात नवीन रुग्ण...


कर्जतची वाटचाल रेड झोनकडे


कर्जत,ता.27 गणेश पवार


                         कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळत असून कर्जत तालुक्याची वाटचाल रेड झोनकडे चालली आहे.कर्जत तालुक्यात आज 27 मे रोजी 7 नवीन रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 वर पोहचली आहे.आजच्या नवीन रुग्णांमध्ये कर्जत शहरातील सहा आणि माथेरान शहरातील एका नवीन रुग्णांची भर पडली आहे.


                       कर्जत शहरात आज 27 मे रोजी तब्बल पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.त्यात 25 मे रोजी कर्जत शहरातील गुंडगे भागातील मंगल मूर्ती इमारतीत लोणावळा येथून राहण्यासाठी आलेल्या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींची 25 मे रोजी कोरोना टेस्ट करण्यात आली होती.त्या टेस्टचे अहवाल आज जेजे रुग्णालयकडून प्राप्त झाले असून 25 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी आणि दोन मुलांचे कोरोना टेस्टचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले आहेत.गुंडगे भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या समोरील इमारती मध्ये तीन दिवसांपूर्वी ठाणे येथून आलेल्या व्यक्तीचे कोरोना टेस्टचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्याचवेळी कर्जत शहरातील मुद्रे येथील वन विभागतील निवृत्त कर्मचारी असलेली एक 61 वर्षीय व्यक्ती गेल्या चार दिवसांपासून पनवेल कळंबोली येथील रुग्णालयात उपचार घेत होती.त्या रुग्णाचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून काम करणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेला देखील कोरोना झाला आहे.सदर आरोग्यसेविका यांचे वास्तव्य देखील मुद्रे भागातील गुरूनगर येथील आहे.कर्जत शहरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ वर गेली असून त्यात गुंडगे येथील पाच,दहिवली संजय नगर येथील दोन आणि मुद्रे येथील दोन अशा नऊ रुग्णांचा समावेश असून कर्जत शहरातील हे सर्व रुग्ण 22 मे नंतर चे आहेत.


                      आज माथेरान मधील एका आठ वर्षीय मुलीला कोरोना झाला आहे हे स्पष्ट झाले.25 मे रोजी 34 वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेच्या संपर्कात आलेले पती आणि एक मुलगी यांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या.त्या टेस्टचे अहवाल आज 27 मे रोजी आले असून त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे पती यांचा अहवाल निगेटिव्ह तर मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या तारखेला कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्हचे 18 रुग्ण झाले आहेत.त्यातील दोन रुग्ण मृत्युमुखी पडले असून तीन रुग्ण हे कोरोना वर मात करून घरी परतले आहेत.सध्या ओलमण येथील एक,तमनाथ पोपटबाग येथील एक आणि कर्जत शहरातील आठ आणि माथेरान मधील दोन अशा 18 रुग्णांवर वेगवेगळ्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


                        कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 झाल्याने कर्जत तालुक्याची वाटचाल रेड झोन कडे चालली आहे.कर्जत तालुक्यात आज एकदम सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यात कर्जत शहरात नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छता आणि परिसर निर्जंतुकी करण करण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे.त्याचवेळी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी शहरातील सर्व नागरिकांची थर्मल सकॅनिंग करण्यासाठी एक एक्स्पर्ट टीम बोलावली असून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.