अजितदादांनी भाजपसारखे  ई उद्घाटन अथवा जाहिरातबाजी न करता उद्घाटन केले :  संजोग वाघेरे यांचा भाजपला टोला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पिंपरी ( प्रतिनिधी) २९ मे


 


कोरोना परिस्थितीत उड्डाणपुलाचे उद्घाटन करणे पालकमंत्री अजित पवार यांना शोभत नाही असा आरोप भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. महापालिकेत सत्ता आल्यापासून भाजपच्या नेत्याकडून शहरात बहुतांश ई उद्घाटने केली. उलट भाजपसारखेे कोणताही फ्लेक्सबाजी, जाहिरातबाजी न करता साई चौकातील उड्डाणपुलाचे जागेवरती जाऊन साधेपणाने उद्घाटन केले आहे. मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थितीची पाहणी सोडून तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत गुंग होते तर तात्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन पुराच्या पाहणी दरम्यान बोटिंग करण्याची हौस भागवत पर्यटन करण्यात व्यस्त होते. याचा भाजपच्या कार्यकर्त्यांना विसर पडला का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना उपस्थित केला आहे.


काय आहे हे प्रकरण....


आज रहाटणी - पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथे नवनगर विकास प्राधिकरण यांनी उभारलेल्या " छत्रपती संभाजी महाराज " दुहेरी उड्डाण पुलावरील औंध ते काळेवाडीकडे जाणारा मार्ग वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावर भाजपचे पक्षनेते नामदेव डाके यांनी कोरोना सारख्या परिस्थितीत उद्घाटनाची घाई नको होती, असा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला होता.


वाघेरे यांनी पुढे म्हणाले की, मागील वर्षी मुंबई पुणे जुन्या हायवेवरील बोपोडी येथील हरीश ब्रिजचे काम पूर्ण होऊनही सत्ताधारी भाजपला केवळ मोठा नेता येत नव्हता म्हणून पुलाचे उद्घाटन केले नव्हते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या पुलाचे उद्घाटन करुन लोकांसाठी खुला केला, तर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी तात्काळ रोडवर राडारोडा टाकत पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद केला होता. तीच चूक भाजपकडून साई चौकातील संभाजी महाराज दुहेरी उड्डाणपूल याचे काम पूर्ण झालेले नसतानाही केवळ स्थानिक नगरसेवकांच्या बाल हट्टापायी महापौर माई ढोरे यांच्याकडून उद्घाटन करून घेतले होते. त्यामुळे भाजपने इतरांवर आरोप करताना आपल्या अंतराळात जरूर पहावे असा टोला वाघेरे यांनी लगावला आहे.


 


 


 


आज पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अजितदादा पवार पिंपरी-चिंचवड शहरात आले होते.  पिंपरी चिंचवड नव्हे तर संपूर्ण राज्य, देश आणि जग कोरोना विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिला आहे.