लॉक डाऊन काळात नागरिकांना दिलासा देण्याचा कर्जत नगरपालिका प्रशासनाचा निर्णय  आवश्यक सर्व दुकाने उघडणार पण ठराविक तारखेला आणि ठराविक वेळेत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


लॉक डाऊन काळात नागरिकांना दिलासा देण्याचा कर्जत नगरपालिका प्रशासनाचा निर्णय 

आवश्यक सर्व दुकाने उघडणार पण ठराविक तारखेला आणि ठराविक वेळेत

कर्जत,ता.6 गणेश पवार

                           एमएमआरडीए रिजन मधील नगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन व्यवसायाला मोकळीक देण्यात आली आहे.मात्र त्यात सरसकट व्यवहार सुरू ठेवणे हे कर्जत शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.त्यामुळे कर्जत नगरपरिषदेने पुढाकार घेऊन सर्वांना वेळ ठरवून देण्यात आली असून त्या त्या दिवशी ती ती दुकाने उघडली जाणार आहेत.दरम्यान,पालिकेने हा निर्णय घेण्याआधी सरकारी अधिकाऱ्यांकडून बाजू समजून घेतली आणि नंतर व्यापारी फेडरेशनच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिली आहे.

                                दीड महिन्याचा कालावधी लोटला असून कोरोना ला दूर ठेवण्यात कर्जत शहराला यश आले आहे.ज्यावेळी कर्जत शहरात कोरोना चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला,त्यावेळी कर्जत शहराने सलग चार दिवस सर्व व्यवहार बंद ठेवून लॉक डाऊनची कडकपणे अंमलबजावणी केली. त्याचवेळी त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही व्यवहार होत नव्हते आणि त्यामुळे कर्जत शहर अद्याप कोरोना पासून दूर आहे.मात्र 4 मे रोजी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन अटी आणि शिथिल करण्यात आलेले नियम ही बाब लक्षात घेऊन कर्जत या एमएमआरडीए च्या क्षेत्रातील नगरपालिका हद्दीत कोणत्या बाबींना सूट देण्यात आली आहे.हे जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुढाकार घेतला आणि सर्व प्रमुख अधिकारी यांची 5 मे रोजी भेट घेतली.4 मे च्या जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानंतर अन्य सर्व ठिकाणी व्यवहार सुरळीत झाले पण कर्जत शहरात मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही बाबी यांच्यात सूट देण्यात आली नव्हती. कर्जत शहराचे हित लक्षात घेऊन नगराध्यक्ष जोशी यांनी दिवसभरात प्रांत अधिकारी वैशाली परदेशी,तहसीलदार विक्रम देशमुख,पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि पालिका मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या सोबत चर्चा करून शासनाचे नियम आणि अटी समजून घेतल्या. त्यानंतर आपले सर्व सहकारी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह कर्जत व्यापारी फेडरेशन यांच्या पदाधिकारी बरोबर चर्चा केली.

                               कर्जत व्यापारी फेडरेशन बरोबर चर्चा करून कर्जत शहरात कोणते व्यवहार कोणत्या दिवशी सुरू राहतील याबाबत नियोजन केले.राज्य सरकारचा लॉक डाऊन 18 मे पर्यंत असून त्यानुसार पालिकेने नियोजन केले असून  कर्जत नगरपालिका हद्दीमधील सोन्या-चांदीची तसेच हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक आणि मॅकेनिकल वर्क्स यांची दुकाने 6 मे,11मे,12मे आणि 17 मे या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत.कपड्याची आणि चप्पल-बूट यांची दुकाने 7 मे,9 मे,13 मे आणि 19 मे या दिवशी उघडी राहणार आहेत.त्याचवेळी कटलरी, भांडी,स्टेशनरी,स्वीट आणि खाद्यपदार्थ यांची दुकाने 8 मे,10 मे,14 मे आणि 16 मे या कालावधीत उघडी राहणार असून सर्व ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळण्याची सूचना करण्यात आली असून सोशल डिस्टनसिंग न पाळणारे दुकानदार यांच्यावर पालिका कारवाई करणार आहे.तर पान टपरी,हॉटेल विक्री च्या गाड्या यांना सूट देण्यात आली नसून ते व्यवहार बंद राहणार आहेत. तर भाजीपाला,जीवनावश्यक वस्तू आणि दूध यांची दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे कर्जत नगरपालिका कडून जाहीर करण्यात आले आहे.