कोरोना बाधितांची आकडेवारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जाहीर न करता प्रभाग निहाय करून कोरोना हॉट स्पॉटवरच संपुर्ण लक्ष केंद्रित करणेबाबत....... आपला  श्री. सदानंद कृष्णा शेट्टी  मा. अध्यक्ष , स्थायी समिती, पुणे महानगरपालिका   . 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


दिनांक २ मे २०२०


प्रति 


मा.श्री . शेखर गायकवाड 


आयुक्त 


पुणे महानगरपालिका           



विषय : कोरोना बाधितांची आकडेवारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जाहीर न करता प्रभाग निहाय करून कोरोना हॉट स्पॉटवरच संपुर्ण लक्ष केंद्रित करणेबाबत. 



महोदय,


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी प्रशासनाकडून उपाययोजना होत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे नागरिकही घरात आहेत मात्र आपल्याला एक बाब निदर्शनास आणून द्यायची आहे, ती म्हणजे आपण कोरोना बाधितांची आकडेवारी जी क्षेत्रीय कार्यालय निहाय प्रसिद्ध करत आहोत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत तर आहे उलट ज्या प्रभागात कोरोना रुग्ण नाही   असे प्रभाग नाहक वेठीस धरले जात आहेत. पोलिसांकडूनही  सरसकट सर्व परिसर सील कऱण्यात आलेला आहे.  वास्तविक कोरोना बाधितांची आकडेवारी प्रभाग निहाय जाहीर  करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून आपल्याला कोणत्या भागात कोरोना बाधित रुग्ण आहे,त्यानुसार त्या भागावर लक्ष केंद्रित करणे सोयीचे होईल आणि सद्यस्थितीत प्रशासन  व पोलीस यंत्रणेवर पडलेला ताणही कमी होईल आणि शहरातील नागरिकांमध्येही  सकारात्मकता निर्माण होईल. यादृष्टीने नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या काय तर रुग्ण एका प्रभागात जास्त प्रमाणात सापडत असताना ,क्षेत्रिय कार्यालय स्तरानुसार आकडेवारी दिली जात आहे.  परिणामी एका क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या अन्य प्रभागांना त्याचा फटका बसत आहे. उदा. प्रभाग २९ व त्याला लागून असलेल्या भागात कोरोना बाधित जास्त आढळले आहेत मात्र आकडेवारी देताना  कसबा -विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय स्तरावर इतकी  रुग्णसंख्या  अशी दिली जाते. प्रत्यक्षात काही प्रभागात एक - दोन रुग्ण असताना किंवा काही ठिकाणी नाहीत अशी परिस्थिती असताना त्याही प्रभागात पोलीस यंत्रणेने अडथळे उभारून अंतर्गत ये - जा करण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळेच मंगळवार पेठेत रुग्ण संख्या कमी असताना सर्वाधिक रुग्ण असा अपप्रचार झाला आहे. मुळात जर प्रभागनिहाय आकडेवारी जाहीर केल्यास नागरिकही जास्त खबदारदारी घेतील आणि प्रशासनाला जिथे रुग्ण आढळला त्याठिकाणी तसेच  कोरोना हॉट स्पॉटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येईल . त्या- त्या ठिकाणी उपाययोजना प्रभावी ठरतील. त्यामुळॆ आपणांस विनंती आहे कि, प्रशासनाने  सील केलेल्या भागांचा फेर आढावा घेऊन अनावश्यक भाग सीलमधून वगळून तेथील उद्योग - व्यवसाय यांना परवानगी तसेच अंतर्गत येण्या - जाण्याचा मार्ग मोकळा करून त्या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी एजन्सी नियुक्त करावी. तरी वरील बाबींचा    विचार करून त्यानुसार कार्यवाहीचे निर्देश द्यावेत ही  ही  पुनश्च  विनंती. 


कळावे, 


आपला 


श्री. सदानंद कृष्णा शेट्टी 


मा. अध्यक्ष , स्थायी समिती, पुणे महानगरपालिका