समतेचा वेगळा विचार मांडणारे सावरकर हे द्रष्टे व्यक्तिमत्व- अभिनेता राहुल सोलापूरकर यांचे मत ;

                                                                   समतेचा वेगळा विचार मांडणारे सावरकर हे द्रष्टे व्यक्तिमत्व-


अभिनेता राहुल सोलापूरकर यांचे मत ; स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीतर्फे आॅनलाईन व्याख्यान


 


पुणे : आयुष्याच्या शेवटच्या टोकावर असले, तरी आपल्या मातृभाषेबद्दल दुर्दम्य आशावाद असणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे वेगळे व्यक्तिमत्व होते. असे प्रेरणादीप अत्यंत कणखरपणे सामान्यांच्या पाठिशी उभे राहतात आणि आदर्शपथ निर्माण करतात. समाजात समतेचा वेगळा विचार मांडणारे सावरकर होते. ज्या ज्या वेळेला त्यांचे चरित्र, लेख आपण वाचतो, तेव्हा त्यांना हे एवढे कसे सुचले असेल, हा प्रश्न नेहमी पडतो. त्यामुळे आपण प्रत्येकाने सावरकरांची त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊया, असे सांगत अभिनेता व व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी स्वा. सावरकरांविषयी विचार मांडले. 


 


स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीतर्फे स्वा. सावरकर यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर - एक प्रेरणादीप या व्याख्यानाचे आयोजन आॅनलाईन पद्धतीने फेसबुकद्वारे करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, मकरंद माणकीकर, मनोज तारे, श्रीकांत जोशी आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. सुमारे ४ हजार सावरकरप्रेमींनी कार्यक्रमात आॅनलाईन पद्धतीने सहभाग घेतला. 


 


राहुल सोलापूरकर म्हणाले, कवी, नाटककार, लेखक, समाजसुधारक, इतिहासाचे भान असलेले क्रांतीदर्शी अशा अनेक रुपांतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपण ओळखतो. सुमारे ६६ हजारहून अधिक पानांचे साहित्य त्यांनी निर्माण केले. उत्तम विचार मांडत लोकांना जवळ करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. 


 


सूर्यकांत पाठक म्हणाले, तीन वर्षांपूर्वी या समितीची स्थापना झाली. सावरकर जयंती शिवजयंतीप्रमाणे साजरी व्हावी, ही संकल्पना त्यापुढे होती. अनेक मंडळे व संस्थांना आवाहन केले त्यानुसार मागील वर्षी ६२ ठिकाणी प्रतिमापूजन सार्वजनिकरित्या केले. यंदा पुण्यात १३७ ठिकाणी अभिवादन असा कार्यक्रम योजला होता, मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम कसा होणार हा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे हा कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने करण्यात आला. केवळ देशप्रेमासाठी अंदमानात सावरकरांनी इतके कसे दिवस काढले असतील, ही कल्पनाही करवत नाही. बुद्धधी, विज्ञान व हिंदूनिष्ठा असलेले हे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने आम्ही अभिवाद केले.