डोंगर चढून आलेल्या मजुरांना नेरळ पोलीसांनी परत पाठवले... 30 मजूर निघाले होते अकोला जिल्ह्याकडे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 डोंगर चढून आलेल्या मजुरांना नेरळ पोलीसांनी परत पाठवले...

30 मजूर निघाले होते अकोला जिल्ह्याकडे

कर्जत,ता.1 गणेश पवार

                                लॉक डाऊन वाढल्याने कामधंदे बंद असल्याने पुन्हा एकदा गावाची ओढ असलेले रस्त्याने चालत निघाले आहेत.मात्र पनवेल येथे मजूर म्हणून काम करणारे चक्क डोंगर चढून अकोला जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले होते.पेब किल्ला चढून आणि नंतर तो डोंगर उतरून नेरळ च्या हद्दीत पोहचले,पण नेरळ येथे त्यांना पोलिसांनी अडवले असून त्यांना थांबवून जेवण देऊन पुन्हा आले त्याच रस्त्याने घरी पाठवून दिले आहे.

                              कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉक डाऊन सुरू केले असून सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी कोणालाही कुठेही जाता येणार नाही याची काळजी घेतली जात आहे.त्यावेळी कोणत्याही वाहनातून अडकून पडलेले मजूर आणि कामगार जाणार नाहीत याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहेत.मात्र लॉक डाऊन उठत नसल्याने जागोजागी अडकून पडलेले कामगार यांच्या पायाखालची जमीन हलली.तात्काळ अनेक मजूर आणि कामधंदा नसल्याने कामगार हे आपल्या गावाकडे जाण्यास निघाले होते.त्यात पनवेल च्या भागात मजूर म्हणून काम करणारे अकोला जिल्ह्यातील 30 मजूर यांनी दुपारी पनवेल सोडले. महिला आणि पुरुष असे मजूर हे पनवेल येथून शिरवली जंगलातून डोंगर चढून पेब किल्ल्यावर पोहचले. तेथून खाली उतरण्यासाठी प्रवास सुरू केला.डोंगर चढून आलेले मजूर हे पुन्हा डोंगर उतरून खाली उतरले आणि नेरळ येथे स्थानिक आदिवासी लोकांच्या नजरेत पडले. त्यानंतर आनंद वाडी येथील आदिवासी लोकांनी ही बाब मोहाचीवाडी मधील कार्यकर्त्यांना सांगितली.

                             बाहेरील मजूर आले असल्याची माहिती मिळताच नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक पथक तात्काळ तेथे पोहचले.नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाने सर्व मजुरांची तपासणी करून घेतली.नेरळ पोलिसांना तेथे येऊन त्या सर्वांना सायंकाळी त्याच ठिकाणी थांबवण्यात आले.तेथे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील आणि महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी सर्वांना सूचना देऊन उद्या सकाळी पुन्हा आले त्या ठिकाणी परत जाण्याचे आदेश दिले.त्या सर्व 30 मजुरांची राहण्याची व्यवस्था तेथील एका इमारती मध्ये तर रात्रीच्या जेवणाची व्यवस्था स्थानिक रहिवासी आणि जेष्ठ कार्यकर्ते भगवान चव्हाण यांनी केली आहे.याबाबत अधिक माहिती पोलिसांनी घेतली असून सर्व मजूर हे पुन्हा पनवेल येथे पोहचले आहेत.