नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांची चौकशी सुरू... 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांची चौकशी सुरू... 

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून गंभीर दखल

त्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह भावाची माहिती पोलिसांनी मागितली

मात्र कारवाईत चालढकल

कर्जत,ता.29बातमीदार

                            नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी साठी आलेल्या 200 रुग्णांना कोरोनाच्या भीती मध्ये गप्प करून ठेवणारे डॉ महेंद्र धादवड यांची चौकशी करण्यात प्रशासन मागे पुढे करीत असल्याचे दिसून येत आहे.आपला भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आहे असे सांगून कोरोन्टाइन झालेले डॉ धादवड यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह निघाल्याने घाबरलेला कर्जत आणि मुरबाड तालुका भीतीमुक्त झाला आहे.पण डॉ धाडवड यांचे भाऊ खरेच कोरोना पॉझिटिव्ह आहेत काय? याचा शोध प्रशासन घेत होता,पण त्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याने प्रशासन डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, प्रशासन केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगत आहे,पण 21 एप्रिल पासून सुरू असलेली चौकशी कधी पूर्ण होणार?की डॉक्टरांना वाचविण्यासाठी प्रशासन चालढकल करीत आहे काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

                            कर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्द धादवड यांचे मुंबई महानगरपालिकेत नोकरी ला असलेले भाऊ कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने 17 एप्रिल रोजी डॉ धाडवड यांना होम कोरोन्टाइन व्हायला सांगितले. मुरबाड येथे होम कोरोन्टाइन झाल्यानंतर त्यांनी तात्काळ कोरोना टेस्ट करायला सांगण्यात आले होते.पण चार दिवस कोरोना टेस्ट केली नव्हती,त्यानंतर 21 एप्रिल रोजी त्यांना कोरोना टेस्ट करायला मुरबाड तहसीलदार यांच्याकडून भाग पाडण्यात आले होते.त्याचे कारण म्हणजे त्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह भावाला ते भेटून आले होते आणि त्यानंतर त्यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 दिवस बाह्यरुग्ण तपासणी केली होती.अर्ध्या कर्जत तालुक्यातील 198 रुग्ण त्यांनी तपासले असल्याने त्यांचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर कर्जत तालुक्यातील किमान 50 गवे कोरोना बाधित क्षेत्र झाली असती.तर त्यांच्या पत्नी या देखील मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथे वैद्यकीय अधिकारी आहेत.त्यामुळे डॉ धादवड यांच्यासोबत त्यांच्या भावाला बघायला गेलेल्या डॉ सौ धादवड यांच्यामुळे मुरबाड तालुका देखील कोरोना च्या छायेत आला होता.पण सुदैवाने त्या दोघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने कर्जत आणि मुरबाड तालुका एका मोठ्या टेंशन मधून बाहेर पडला होता.

                           मात्र त्या निमित्ताने अनेक प्रश्न समोर आले असून डॉ धादवड यांचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आला म्हणून त्यांना सक्तीने होम कोरोन्टाइन व्हावे लागले होते.मात्र कोरोना टेस्ट करण्यासाठी डॉ धादवड यांच्याकडून करण्यात आलेला उशीर आणि ते नेरळ येथे बाहेरून आलेल्या लोकांची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जायचे,पण गाडीतून खाली उतरत नव्हते.त्यामुळे ते काहीतरी लपवत असल्याचे बोलले जात असून त्यांची चौकशी रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांनी नेरळ येथे 21 एप्रिल रोजी आले असता चौकशी सुरू केली असल्याचे कळविले होते.मात्र त्यानंतर 8 दिवसांचा कालावधी लोटला असून डॉ धादवड यांचा भाऊ खरेच कोरोना पॉझिटिव्ह आहे काय?याची माहिती समोर आली नाही.दोन तालुक्यांना वेठीस धरणाऱ्या डॉ धादवड यांची चौकशी प्रशासनाने केलीच पाहिजे अशी मागणी दोन्ही तालुक्यातून होत आहे.त्याचवेळी डॉ धादवड यांचे भाऊ अंबरनाथ येथे राहतात आणि कर्जत येथून अंबरनाथ तहसीलदार कार्यालय जेमतेम 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रशासनाला डॉ धादवड यांच्या कोरोना पॉझिटिव्ह भावाबद्दल तात्काळ माहिती मिळू शकते.त्याचवेळी अंबरनाथ मध्ये कोरोना बाधित क्षेत्र यावरून देखील ती माहिती मिळू शकते.असे असताना पोलीस प्रशासन यांच्याकडून माहिती मागविली आहे अशी उत्तरे येत आहेत तर प्रशासन तालुका वैद्यकीय अधिकारी हे कारवाई करतील आणि माहिती देतील असे सांगण्यात आले आहे.

                        त्यामुळे डॉ धादवड यांना वाचविण्यासाठी प्रशासन काम करीत असल्याचा आरोप मावधिकार आयोगाचे कार्यकर्ते गोरख शेप यांनी केला आहे.दोन तालुक्यांना गॅस वर ठेवणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर का मेहेरनजर दाखवावी असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.