क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत 'स्टार्टअप'ला मोठ्या संधी* देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; 'आयसीएआय'तर्फे 'लॉकडाऊन : नवी पहाट'वर लाईव्ह वेबिनार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सेवा क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत 'स्टार्टअप'ला मोठ्या संधी*

देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; 'आयसीएआय'तर्फे 'लॉकडाऊन : नवी पहाट'वर लाईव्ह वेबिनार

 

पुणे : "लॉकडाऊननंतर अनेक समस्याना सामोरे जावे लागणार असले, तरी एक नवी पहाट आपली वाट पाहत आहे. या आव्हानात्मक स्थितीत मोठ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील अनेक गुंतवणूकदार भारताकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. चीनमधून अनेक उद्योगांनी काढता पाय घेतल्याने या उद्योगांना आपल्याकडे येण्याचा पर्याय आहे. अशावेळी सेवा क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत स्टार्टअप्सना मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. 'बी इंडियन बाय इंडियन' या दृष्टीकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल," असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

दि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने 'लॉकडाऊन : नवी पहाट'वर आयोजित वेबिनारमध्ये सनदी लेखापालांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. महाराष्ट्र हौसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, ज्येष्ठ सनदी लेखापाल सीए डॉ. एस. बी. झावरे, 'आयसीएआय'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पठारे, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे खजिनदार सीए आनंद जाखोटीया, सीए यशवंत कासार आदींनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला.

 

गृहनिर्माण क्षेत्रातील समस्या, रोजगारसंधी आणि अर्थव्यवस्था यावर चर्चा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "या स्थितीवर मात करण्यासाठी मार्गही आपल्याला शोधावे लागणार आहेत. केवळ व्यवसाय सुरू होणे, याला आपले प्राधान्य नको, तर आर्थिक गतिविधी पूर्ण ताकदीने सुरू होतील, याचा विचार करावा लागणार आहे. यासाठीचे नवे मार्ग आणि नियमावली आपल्याला तयार करावे लागतील. ई-लर्निंग, नवीन डिजिटल बाजारपेठ, घरातून काम करणे, नवीन व्यावसायिक परिस्थिती, नवीन गुंतवणूक संधी इत्यादी अनेक बाबी स्वीकाराव्या लागतील. नवीन जीवनपद्धती स्वीकारत कोरोनासोबत जगण्याची सवय आपल्याला करावी लागेल. स्थानिक पातळीवर आपल्याला उत्पादन आणि नवनिर्मिती करावी लागणार आहे. जेणेकरून आयात निर्बंधित होईल. बांधकाम क्षेत्रासह कृषी, पर्यटन, शिक्षण आदी क्षेत्रात आपल्याला आमूलाग्र बदल करावे लागतील. सरकार, बँका आणि उद्योग यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच अर्थव्यवस्था बळकट होईल."

 

राजेंद्र मिरगणे म्हणाले, "कृषीनंतर बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती होते. मात्र आधी जागतिक मंदी आणि आता लॉकडाऊन यामुळे या क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. यातून बाहेर पडायचे असेल, तर आपल्याला अल्प उत्पन्न आणि आर्थिक मागास वर्गातील लोकांसाठी घरांची निर्मिती करणे गरजेचे आहे. करांमध्ये सवलती मिळाव्यात. प्रस्ताव लालफितीत अडकवून ठेवता कामा नयेत. जीएसटीतील सूट देण्यासह बांधकाम साहित्याचे दर निश्चित करावेत. सरकारकडून विकसकांना मिळणारा निधी लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे."

 

सीए डॉ. एस. बी. झावरे म्हणाले, "लॉकडाऊनमुळे सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र लवकर कार्यशील व्हावे." सीए अभिषेक धामणे यांनी प्रास्ताविक केले. सीए समीर लड्डा यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले. सीए काशीनाथ पठारे, सीए यशवंत कासार व सीए आनंद जाखोटीया यांनीही आपले विचार मांडले.