व्हाट्सअॅप मार्गदर्शिका प्रकाशित समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी - गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


व्हाट्सअॅप मार्गदर्शिका प्रकाशित


समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी


 


- गृहमंत्री अनिल देशमुख


मुंबई, दि.12:  सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेस केले आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. समाजमाध्यमाद्वारे या संदर्भात चुकीची माहिती, दहशत व भीती पसरविणाऱ्या बातम्या समाजात पसरू नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक  पसरविलेल्या  संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता शासनाने समाजमाध्यमांकरिता विशेष मार्गदर्शिका प्रकाशित केली असून त्याचे सर्वांनी पालन करावे, असे श्री देशमुख यांनी म्हटले आहे.


मार्गदर्शिका प्रकाशित


सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव व संबंधित लॉकडाउनच्या काळात समाजमाध्यमांवर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने व्हाट्सअॅपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज,पोस्ट्स पाठवून व कोरोना प्रादुर्भावाला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत. महाराष्ट्र सायबरने  व्हाट्सअॅप या मेसेजिंग प्लॅटफॉर्म वरील सर्व ग्रुप सदस्य, ग्रुप ऍडमिन्स, ग्रुप निर्माते (creators/owners ) यांचे करिता एक मार्गदर्शिका प्रसारित केली आहे. ज्यानुसार व्हाट्सअॅप वापरताना पुढील  दक्षता घ्याव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे.


व्हाट्सअॅप ग्रुप सदस्यांसाठी


·       चुकीच्या /खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये.


·       आपल्या ग्रुपमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण अजून पुढे कोणालाही पाठवू नये.


·       आपण ग्रुपवर कोणतीही पोस्ट टाकल्यास व त्यावर ग्रुप ऍडमिन किंवा अन्य ग्रुप सदस्यांनी आक्षेप घेतल्यास तात्काळ सदर पोस्ट त्या ग्रुपवरून व आपल्या मोबाईल फोनवरूनसुद्धा  काढून (Delete) टाकावी.


·       तुम्हाला मिळणाऱ्या बातमीचा स्रोत व त्याची सत्यता पडताळूनच ती बातमी आवश्यक वाटल्यासच फॉरवर्ड करावी. तसेच ग्रुप वर येणारे व्हिडिओ, मीम्स यांचा उद्देश समजवून घेऊनच पुढे पाठवावे.


·       जर आपण सदस्य असणाऱ्या ग्रुपवर काही खोटी/चुकीची, आक्षेपार्ह बातमी, व्हिडिओज, मीम्स किंवा पोस्ट्स येत असतील ज्यामुळे जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात, अशा पोस्ट्सबद्दल ग्रुप ऍडमिनला सांगून तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करू शकता तसेच त्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (Website ) पण देऊ शकता.


·       कोणत्याही धर्म, समुदाय विरुद्ध हिंसक, अश्लील, भडकावू व तेढ निर्माण होईल असे साहित्य, पोस्ट्स, विडिओ, मीम्स कोणत्याही ग्रुपवर किंवा वैयक्तिकपणे सुद्धा शेअर करू नये, तसेच तुमच्या मोबाईलमध्ये पण स्टोअर करू नका.