पुणे प्रवाह न्युज पोर्टल
....या अधिकार्यांच्या समयसूचकतेमुळे हिंगोलीकरांचा धोका टळला
__________________________________
हिंगोलीच्या राज्य राखीव पोलिस दल क्रमांक 12 मधील मुंबई व मालेगाव येथून परतलेल्या जवानांना सरकारी विलगीकरण कक्षात ठेवले नसते तर….या विचारानेच हिंगोली करायची झोप उडाली आहे. मात्र, हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे व हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील या दोघांच्या चर्चेतून मुंबई व मालेगाव येणाऱ्या जवानांच्या घशाच्या लाळेचे नमुने घेऊन 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याचा मुद्दा समोर आला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या या सूचनेवर तातडीने अंमलबजावणी करून एसआरपीएफच्या समादेशकांना याबाबतचा आदेश दिला आणि 191 जवानांचे विलगीकरण झाल्याने हिंगोलीकरांचा मोठा धोका टळला.
मागील महिनाभरापासून पेक्षा अधिक काळापासून हिंगोलीच्या राज्य राखीव पोलिस दलातील 191 अधिकारी व जवान मुंबई व मालेगाव येथे संचार बंदीच्या बंदोबस्तासाठी गेले होते. मुंबईतील धारावी, वरळी कोळीवाडा व अन्य काही भाग तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्यातील कोरोणाचे हॉटस्पॉट म्हणून पुढे आले आहेत. बंदोबस्तचा कालावधी संपवून एसआरपीएफचे जवान व अधिकारी मालेगाव व मुंबई येथून हिंगोलीत परत येणार असल्याची माहिती प्रशासनाला आली होती. प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील व हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे हे दोघे ,हिंगोलीत ठेवलेल्या परप्रांतीय मजुरांच्या निवारा कक्ष व लॉकडॉऊनमधील अन्य उपायोजना संबंधात चर्चा करत होते. त्याचवेळी मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी उपजिल्हाधिकारी चोरमारे यांना एसआरपीएफच्या मालेगाव व मुंबईहून येणाऱ्या जवानांना सरकारी विलगीकरण कक्षात ठेवावे व त्या सर्वांचे घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत असा मुद्दा मांडल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. रामदास पाटील व अतुल चोरमारे या दोघांनी ही बाब जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना सांगितली. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी तातडीने यावर अंमलबजावणी करत एसआरपीएफचे समादेशक मंचक इप्पर यांना मालेगाव व मुंबईहून किती अधिकारी आणि जवान परत येणार आहेत याची माहिती घेतली. तसेच हे जवान हिंगोलीत दाखल झाल्यावर सर्वप्रथम त्यांची आरोग्य तपासणी करून विलीनीकरण कक्षात ठेवण्याची सूचना केली. या सूचनेची जिल्हा प्रशासन, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास व टीम आणि एसआरपीच्या अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली. बंदोबस्तावरून परत आलेले हे जवान घरी राहिले असते तर किराणा भाजीपाला अथवा अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या कामासाठी हिंगोली शहरात फिरण्याची शक्यता फिरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि हे जवान जर हिंगोली शहरात फिरले असते तर त्यातून व्यक्ती अथवा समूह संसर्ग होण्याचा मोठा धोका देखील निर्माण झाला असता. तसेच आवश्यकता पडल्यास या जवानांना बंदोबस्त देखील करावा लागण्याची शक्यता होती. हिंगोली शहरात व जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही तसेच वैद्यकीय अथवा कुठले तरी कारण पुढे करून बाहेर फिरणाऱ्यांची संख्याही कमी नाही. दर एक दिवस आड हिंगोली शहर व जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता असुन जीवनावश्यक वस्तू साठी बाजार खुला असल्यामुळे ही संधी साधत काम नसताना देखील बरेच नागरिक बाहेर पडतात. त्यामुळे अशावेळी मालेगावहुन कोरोनाग्रस्त होऊन आलेले जवान जर हिंगोलीकरांच्या संपर्कात आले असते तर ही कल्पना थरकाप उडवणारी आहे.
जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांना थेट 14 दिवस सरकारी विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये लाभ झाला आहे. मुख्याधिकारी रामदास पाटील व उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी दाखवलेली समयसूचकता आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रुचेश जयवंशी यांनी त्यावर तातडीने केलेल्या अंमलबजावणीमुळे हिंगोली करांचा मोठा धोका टळला आहे. हिंगोलीत आजवर निष्पन्न झालेल्या सात कोरोनाग्रस्तांना ट्रॅव्हल हिस्ट्री असून कॉन्टॅक्ट हिस्ट्री मधून हिंगोलीतील एकाही नागरिकाला कोरोनाची बाधा झाली नाही.