आमच्या सोसायटीत आम्ही हे केले, आपणही जरूर करा !                                                अंधेरीत असलेली आमची विजयनगर ही सोसायटी.... मकरंद करंदीकर.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आमच्या सोसायटीत आम्ही हे केले, आपणही जरूर करा !


                                               अंधेरीत असलेली आमची विजयनगर ही सोसायटी ६०० मराठी कुटुंबांची खूपच मोठी सोसायटी आहे.. खूप मोठा परिसर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या सोसायटीच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर रोज अद्ययावत माहिती दिली जाते. घराबाहेर न पडण्याचे सतत आवाहन केले जाते. लोकही मुद्दाम घराबाहेर पडत नाहीत. सोसायटीच्या बाहेर जायचे असेल तर गेटवरील सिक्युरिटीकडे रजिस्टरमध्ये सर्व तपशील द्यावा लागतो. सोसायटीत बाहेरच्या कुठल्याही माणसाला, योग्य कारणाशिवाय आत प्रवेश दिला जात नाही.  एक दिवसाआड भाजी, ब्रँडेड  ( टेस्ट फॉर लाईफ ) कणिकव अन्य पिठे तसेच फळे व ब्रेड सोसायटीतच मागवले जातात. खरेदी आधी प्रत्येकाला क्रमांक ( टोकन ) देऊन लांब लांब बसविले जाते. तुमचा नंबर आल्यावरच तुम्ही एकट्याने तेथे जायचे. लिफ्टमध्ये आत शिरण्याआधी सिक्युरिटीकडे ठेवलेला सॅनिटायझर हातांना लावावा लागतो. वृत्तपत्रे / नियतकालिके बंद केली आहेत. आतल्या परिसरातही अधिक लोकांना फिरू दिले जात नाही. 


                   ज्येष्ठ नागरिकांना ( ज्यांच्या घरी कुणी नसेल तर ) ४ तरुणांनी आपले मोबाईल क्रमांक आपणहून जाहीर केले आहेत, त्याना बोलाविल्यावर ते अत्यावश्यक कामे ( औषधे आणणे, किराणा माल आणणे, बँकेतून पैसे आणून देणे ) करून देतात. विमा हप्ता, विविध बिले, अन्य तातडीची बिले भरणे यासाठी ज्यांच्या खात्यातून ऑनलाईन पेमेंटची सोय नाही, त्यांची बिले अन्य खात्यातून ऑनलाईन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोसायटीतील वयोवृद्ध, एकाकी व्यक्तींना, आमच्याच  सोसायटीतील ३ मानसोपचार तज्ञ तरुणींनी आपापले मोबाईल क्रमांक देऊन ज्याला या कोरोना साथीमुळे मानसिक तणाव, नैराश्य, दडपण वाटेल, भीती वाटेल त्यांना फोन करून सल्ला देणे, त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारणे अशा अभिनव आणि उपयुक्त गोष्टी उपलब्ध केल्या आहेत. कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर ज्यांना आपापल्या घरी जाणे शक्य नाही अशा सोसायटीच्या  सिक्युरिटीज / नोकरवर्गाची सोसायटीतच राहण्याची सोय करण्यात आली असून त्यांना रोज भोजन, चहा, नाश्ता दिला जातो. सोसायटीत प्रचंड प्रमाणावर झाडे आहेत. त्यांना पाणी देण्याचे काम एका तरुणांच्या गटाने स्वीकारले आहे. अर्थातच ही सर्व कामे विनामूल्य केली जातात. तरुण मंडळींवर बेजबाबदारपण, बेपर्वाईचे आरोप केले जातात. पण अशावेळी त्यांचे हे उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन काम करणे नक्कीच कौतुकास्पद आहे. सोसायटीचे कार्यकारिणी सभासद आणि हा सर्व स्वयंसेवी मंडळींच्या गटाचे खूप कौतुक होते आहे.


                               सोसायटीतील ६ टॉवेर्सच्या १४ विंग्ज आणि १०/१० मजले आहेत. या सर्व १५० हुन अधिक मजले, कॉरिडॉर्स व २८ लिफ्टमध्ये परवा जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसोबत आमच्या विभागातील  नगरसेवक श्री. अभिजित सामंत हे जातीने या प्रत्येक मजल्यावर देखरेख करीत होते. लोकांच्या आत्यंतिक गरजेच्या वेळी अशी कामे करण्याऱ्या  नेत्याची लोकांनाही आठवण राहतेच. निवडणुकीच्यावेळी लवाजम्यासह मते मागायला येण्यापेक्षा अशावेळी केलेले काम लाख मोलाचे ठरते. प्रत्येक टॉवर खाली एक दिवसाआड वर्गीकरण केलेला कचरा ३ ड्रम्समध्ये संकलित केला जातो. तेथे प्रत्येकाने तो नेऊन टाकायचा. तेथे आमचेच २ / २ स्वयंसेवक मदत करीत असतात.


                           पंप्रधान मोदींनी आवाहन केल्यावर, या देशातील अनेक शहाण्यांनी "'असहकार आंदोलन ''   
केले. मोदी सांगतायत ना, मग ते कितीही योग्य असेल तरी आम्ही त्यांना विरोध करणार, आम्हाला घटनेने दिलेले स्वातंत्र्य आहे. पण सुदैवाने आपले भले कशात आहे हे ओळखण्याचा सूज्ञपण आमच्या सोसायटीच्या इतक्या मोठ्या लोकसंख्येकडे आहे. त्यामुळे कटू प्रसंग येत नाहीत. सर्वांनीच मनावर घेतल्याने हे सर्व इतक्या मोठ्या सोसायटीतही शक्य झाले आहे .
        
                        आम्ही हे केले आहे. आपणही सर्व आपापल्या पद्धतीने करताच आहात. पण  एकमेकांच्या ऐकून काही अभिनव कल्पना आपण अंमलात आणू शकतो. " कोरोनाको हराना " हे सर्वांचे उद्दिष्ट आहे. 
त्याला १००% यश लाभो ! 


( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा ).                                                                                                     ***** मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com