आझम कॅम्पस मशिदीची पालिका आयुक्तांकडून पाहणी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट
----------------------------------------
*आझम कॅम्पस मशिदीची पालिका आयुक्तांकडून पाहणी*
-------------


संशयित रुग्ण व्यक्तींच्या  क्वारंटाईनसाठी 
आझम कॅम्पस मशीद इमारतीमधील  संपूर्ण मजला  


पुणे :



पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी आझम पुणे कॅम्प  भागातील आझम कॅम्पस मशीद ला भेट देवून पाहणी केली. संशयित कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन सुविधा करण्यासाठी जागेची पाहणी केली. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता त्यांनी भेट दिली.आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,विश्वस्त तन्वीर इनामदार ,एड.इफ्तेकार इनामदार यांच्यासमवेत त्यांनी मशिदीच्या इमारतीत, पहिल्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या सभागृहाची पाहणी केली.पालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी त्यांच्यासमवेत होते.



'आझम कॅम्पस आणि डॉ पी ए इनामदार यांनी काळाच्या पुढे जाणारे पाउल उचलले असून धार्मिक ठिकाणे ही उपचार केंद्रे होण्याइतकी चांगली गोष्ट दुसरी नाही.प्रशासनाने अशा ठिकाणी संशयित रुग्ण ठेवले तर काळजी घेतली जावी,स्वच्छता ठेवली जावी,रुग्णांना हायजिनिक जेवण मिळावे,कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट लावावी',अशी अपेक्षा असल्याचे  शेखर गायकवाड यांनी सांगितले.'अनेक संस्थांनी या कामी पुढे यावे,आयसोलेशन आणि सुरक्षित अंतर ठेवण्याची काळजी घ्यावी',इतकीच अपेक्षा आहे,असे ते म्हणाले.


कोरोना ची  वाढती व्याप्ती लक्षात घेता कॅम्प,भवानी पेठ,नाना पेठ ला लागून असणाऱ्या आझम कॅम्पस च्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या  क्वारंटाईन साठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली होती ,हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारला असून   तसे पत्र कॅम्पस चे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांना दिले होते .प्रशासनाच्या पत्रानंतर ही जागा ताब्यात देण्यासाठी स्वच्छता आणि सुविधांची तयारी बुधवारपासून सुरु झाली.आणि आज मनपा आयुक्तांनी भेट देवून पाहणी केली.या जागेत साधारण ८० संशयित रुग्णांची व्यवस्था होवू शकणार आहे.
  
आझम कॅम्पस मधील  प्रार्थना स्थळाच्या पहिल्या मजल्यावरील ९ हजार चौरस फुट जागा  सर्व वीज ,पंखे ,स्वच्छतागृह ,पार्किंग सुविधांसह देण्याची तयारी येथील व्यवस्थापनाने दर्शवली आहे . येथे आलेल्या संशयित रुग्णांची नाश्ता,जेवणाची व्यवस्था करण्याची,पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते .आझम कॅम्पस मधील शैक्षणिक सुविधा पूर्ववत सुरु होईपर्यंत ही जागा शासनाला उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले होते. त्यानुसार सर्व सुविधांसह हा मजला तयार झाला असल्याची माहिती आझम कॅम्पस चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी सांगितले.


आझम कॅम्पस परिसरामध्ये महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक अस्थापना असून २४ एकर मध्ये हा परिसर आहे. त्यातील एका भागात पूर्वीपासून मशीद आहे. या मशिदीतील पहिल्या मजल्यावर ९ हजार चौरस फुटाचा सभागृहासारखा मजला आहे. त्याचे रुपांतर क्वारांटाइन वार्ड मध्ये करता येणे शक्य आहे.येथील शैक्षणिक इमारतींमधील शाळा ,महाविद्यालये सध्या बंद आहेत.लागेल तेव्हा आणखी जागा देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनासमोर आहे,असेही डॉ.पी ए इनामदार यांनी सांगितले.


'कोरोना हे आंतर राष्ट्रीय संकट असून ते परतवून लावण्याच्या शासकीय प्रयत्नात जबाबदार नागरिक म्हणून ,संस्था म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडण्यास तयार आहोत.आपल्याकडील साधने सरकारी यंत्रणेच्या मदतीला देण्याची ही वेळ आहे',असेही डॉ इनामदार यांनी सांगितले.


दरम्यान,रमजान च्या पवित्र महिन्यात मशिदींमध्ये न जाता घरीच नमाज पठण करण्याचे आवाहनही डॉ पी ए इनामदार यांनी केले आहे.कॅम्पस मधील युनानी मेडिकल कॉलेज चे २५ डॉक्टर्स ५ रुग्ण वाहीकांमधून पेठांमध्ये रुग्ण सेवा करीत आहेत . तसेच आझम कॅम्पस ने आता पर्यंत २५ लाखाहून अधिक किमतीचे किराणा सामान गरजूंना वितरीत केले आहे .
---------------------------------------


फोटो ओळ
पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी आझम पुणे कॅम्प  भागातील आझम कॅम्पस मशीद ला भेट देवून पाहणी केली.. संशयित कोरोना रुग्णांसाठी आयसो लेशन सुविधा करण्यासाठी जागेची पाहणी केली. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता त्यांनी भेट दिली.


................................................