पुणे स्मार्ट सिटी कमांड सेंटरला करोना वॉर रूमचे स्वरुप* *‘करोना’संबंधी प्रभावी व्यवस्थापनासाठी पुणे स्मार्ट सिटीचा डॅशबोर्ड, मोबाइल अॅप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे स्मार्ट सिटी कमांड सेंटरला करोना वॉर रूमचे स्वरुप*


*‘करोना’संबंधी प्रभावी व्यवस्थापनासाठी पुणे स्मार्ट सिटीचा डॅशबोर्ड, मोबाइल अॅप*


पुणे :
कोविड -१९ तथा करोना विषाणूच्या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या सहकार्याने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) कोविडविरूद्धची लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी एक नवा डिजिटल डॅशबोर्ड विकसित केला आहे. तसेच पुणे स्मार्ट सिटीच्या हाय-टेक कमांड अँड कंट्रोल सेंटरला वॉर रूमचे स्वरुप प्राप्त झाले आहे. करोना व्हायरस संबंधीच्या कार्यवाहीचे निरीक्षण, नियंत्रण व समन्वय करण्यासाठी या कमांड सेंटरचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. 


महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, यांनी नुकतीच या कमांड सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख राहुल जगताप व इतर अधिकारी उपस्थित होते.


पुणे स्मार्ट सिटीने पुणे महापालिकेच्या सहकार्याने कमांड सेंटरच्या कार्यप्रणालीत काही दिवसांतच महत्त्वपूर्ण बदल आत्मसात केले आहेत. येथे एकात्मिक डॅशबोर्ड तयार केला असून, त्याद्वारे शासकीय विलगीकरण केंद्रांची अद्ययावत माहिती, संशयित रुग्णांची आरोग्यविषयक माहिती आणि घरात विलगीकरण केलेल्या लोकांचा व त्यांच्या संपर्कांत आलेल्यांचा मागोवा घेण्यात येत आहे. यासंदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या असून, त्या माध्यमातून महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष नागरिकांना साह्य करत आहे.


या व्यतिरिक्त पुणे स्मार्ट सिटीने जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून करोना बाधित व संशयित अशा प्रत्येक रुग्णांचे मॅपिंग केले आहे. नायडू रुग्णालयात आरोग्य सेवांचा आढावा घेतला जात आहे. तसेच हीट मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे.


पीएससीडीसीएल जीआयएस प्रणालीचा उपयोग करून शहरातील विविध भागांचा मागोवा घेते आणि त्यानुसार जिथे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तिथे बफर झोन तयार केले जातात. तिथे आरोग्यसेवक सर्वेक्षण करतात व सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधात्मक योजना राबविण्यात हे तंत्रज्ञान मदत करते. कंटेन्मेंट झोनचे मॅपिंग डॅशबोर्डवर प्रतिबिंबित होते.


संयम हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे शासकीय विलगीकरण केंद्र तसेच घरी क्वारंटाईन केलेल्या लोकांना ऑनलाइन साह्य देण्यात येत आहे. विलगीकरण केंद्रांवर ठेवलेल्या लोकांना स्मार्ट सिटीने नि:शुल्क वायफाय सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. व्हीएमडी स्क्रीन, सोशल मीडिया आणि वेबसाइटवर सोशल मेसेजिंगद्वारे जनजागृती मोहीम राबविली जात आहे. नागरिकांना pmc.gov.in/covid या लिंकवर अद्ययावत माहिती दिली जाते. 


एका क्लिकवर विविध कामांचा आढावा घेण्याकरिता स्मार्ट सिटी कमांड सेंटरकडे प्रगत तंत्रज्ञान आहे, त्यामुळे त्यात आवश्यक बदल करून करोनाविरूद्धच्या लढाईत या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग होत आहे.
व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले स्क्रीन, सार्वजनिक घोषणा प्रणाली, आपत्कालीन कॉल बॉक्स, स्ट्रीटलाईटिंगसह अशा विविध विविध स्मार्ट इलेमेंट्स व कामांची देखरेख करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने 3 वर्षांपूर्वी कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले होते. करोना विषाणूची आपत्ती शहरात आल्याने याकामी कमांड सेंटरचा प्रभावी वापर करत आहोत, असे पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी सांगितले.