पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*कोरोना आणि शेतकरी संप*
- अनिल घनवट
परवा मुंबईहुन अॅड. सतिश बोरुळकारंचा फोन आला व हसुन म्हणाले की शहरातल्या लोकांना आता आपली गरज भासू लागली आहे. भाजिपाला गावकडुन मागवता येइल का पहा म्हणाले, बाहेर जायची भिती वाटते व भाजिपाला मिळत ही नाही. कोणी विकायला तयार असेल तर आपल्या सोसायटीच्या कंपाउंड मध्ये गाडी लावुन भाजिपाला विकत घेऊ.........
हा संवाद झाल्या नंतर सर्ररकन काही वर्षा पुर्वीच्या जुन्या घटना डोक्यात गोधळ घालू लागल्या. भाजोपाला, फळे, फुले नियमनमुक्त केल्या नंतर शेतकर्यांनी थेट ग्राहकांपर्यंत आपला माल विकण्याचा प्रयत्न केला होता पण स्थानिक गुंड, पोलीस, नगरसेवक, मनपाचे कर्मचारी, प्रस्थापित भाजी विक्रेत्यांनी या शेतकरी तरुणांना रसत्यावर उभे रहाणे सुद्धा बंद केले. हेच नाही तर काही खडुस नागरिक सुद्धा चालता चालता " ही काय भाजी विकायची जागा आहे का, आता इथे घाण करुन जाणार, भिकारडे साले" अशा तोंडावर थुंकल्या सारखे शेरेबाजी करत तिरस्काराने पहात जायचे. या सर्व प्रकाराला वैतागुन काही शेतकर्यांनी मुबईच्या मंत्रालयासमोर भाजीपाला फेकुन आपला रोष व्यक्त केला होता.
भाव करायला हा काय भाजिपाला आहे काय? हे वाक्य चिज वस्तुंच्या दुकानात हमखास ऐकायला मिळतेा. भाजिपाल्याचे भाव किती कमी करावा याला ही मर्यादा असाव्यात ना. मेथीच्या जुड्या, दहा रुपायाला चार अोरडुन शेतकरी विकत होता तरी चांगली भारी साडी नेसलेली, पारलरमध्ये जाउन आलेली महिला, दहाच्या पाच नाही का? असा भाव करताना मी पाहिली आहे.
१जून २०१७ला शेतकर्यांनी संप जाहीर केला व शहरात शेतीमाल जाऊ द्यायचा नाही म्हणुन काही ठिकाणी भाजीपाला, दुध रसत्यावर फेकले गेले. काय अकांड तांडव केला शहरातील विद्वानांनी या नासाडी बद्दल. आज कोरोनामुळे लाखो टन माल शेतात सडतो आहे. पोलीस निर्दयपणे भाजिपाला विकणार्यांना ठोकत आहेत. माल रस्त्यावर फेकत आहेत आता का यांची दातखीळ बसली आहे?
दोन तिन दिवसां पुर्वी नाशीकच्या सातपुर एम आय डी सी भागातुन एक अनोळखी नंबरवरुन फोन आला. एक तरुण दु:खी आवाजात बोलत होता. तो म्हणाला की त्याने नविनच फरसन पॅकिंगचा व्यवसाय सुरु केला आहे. ठोक भावात फरसान घेउन पाच रुपये विक्रीची पाकिटे तयार करुन किराणा दुकानांना पोहोच करतो. एक टेम्पो मध्ये खोकी भरुन तयार आहेत, एक खोली पॅक केलेल्या मालाने भरली आहे. हा माल जर मी विकला नाही तर माझे ८० ते ९० हजाराचे नुकसान होणार आहे. मी कायमचा बरबाद होइल. पोलीस रसत्यावर सुद्धा येऊ देत नाहीत. परवानगी तरी कशी काढावी. काही करता येइल ाका साहेब. प्लीज.....
मी नगरला, हा नाशिकला, काय करू शकत होतो मी? पण त्याला धिर देण्यासाठी, पहातो काही करता येते का असे म्हणालो. काल पुन्हा त्याचा फोन आला. आता विषय वेगळाच होता. त्याचे एक स्नेही दर वर्षी कलिंगडचा व्यवसाय करतात. या वर्षी शेतकर्यांना उचल देउन तिन लाखाचे कलिंगड खरेदी केले अाहे. रस्त्याच्या कडेला ताडपत्रीचे तात्पुरते छत करुन ते कलिंगड विकतात पण आता पोलिस त्यांना तेथे थांबू देत नाहीत. मी म्हणालो अरे शेतीमाल विकायला बंदी नाही ते असे अडवू शकत नाहीत. पण तो म्हणला कोणी ऐकुन घेत नाही साहेब, सरळ मारतात, मालाचे नुकसान करतात काही तरी पहा. पुन्हा डोके सुन्न झाले. आता हा तर थेट शेतकर्यांशी संबंधित विषय काही तरी केलेच पाहिजे. कालचा दिवस अस्वस्थतेतच घेला. आज सकाळी अचानक लक्षात आले, नाशिकला विश्वास नांगरे पाटील पोलिस आयुक्त आहेत. पाहू काही मदत करतात का. नांगरे पाटलांचा माझा एकदाच सामना झालेला. ते नगरला जिल्हा पोलिस अधिक्षक होते. श्रीगोंद्याच्या तहसीलदारच्या श्रीमुखात भडकवुन त्याला काळे फासण्याच्या आरपाखाली मी श्रीगोंद्याच्या लॉकअप मध्ये बंद होतो. ३५३ सहीत अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील लावलेला. विषय गंभीर होता म्हणुन स्वत: नांगरे पाटील आमची खबर घ्यायला श्रीगोंद्याच्या लॉकअप पर्यंत आले होते. त्यांनी आम्हाला कायदा हातात घेता म्हणुन सज्जड दमही भरला होता. इतकाच दोन मिनिटांचा आमचा परिचय पण अधिकारी चांगला असल्याची ख्याती म्हणुन त्यांचा फोन नंबर मिळवला व धाडसाने फोन केला. फोन उचलाताच मी सांगितले मी, अनिल घनवट शेतकरी संघटना अध्यक्ष. ते म्हणाले बोला घनवट साहेब. मी उडलोच. श्रीगोंद्याच्या भेटीचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणाले बोला मी आोळखतो तुम्हाला, काय काम आहे? मी त्यांना कलिंगडवाल्याची व्यथा सांगितली. त्यांनी लगेच कोणत्या भागात व्यवसाय करतात. त्यांचा नंबर मला एस एम एस करा मी सांगतो तिथल्या डिपार्टमेंटच्या लोकांना असे सांगितले. मला एक युद्ध जिंकल्या सारखे वाटले. अशा पोलिस अधिकार्यांना मनापासुन सलाम.
शेती, तसा एक तुच्छ समजला जाणारा व्यवसायाला अचानक महत्वाचा झाला. ज्याला रसत्यावर भाजी विकू दिली जात नव्हती त्याला सोसायटीत निमंत्रण आले. पण परिस्थिती संपा पेक्षा गंभीर होणार आहे याची जाणीव मला काल झाली. बोरुळकर वकील साहेबांच्या फोन नंतर मी भाज्या पिकवणार्या शेतकर्यांना फोन करुन मुंबईत भाजी विकणार का, तिथे व्यवस्था आहे असे सांगितले पण काही म्हणाले " कोण जायचय तिथे कोरोनात मरायला". कोण म्हणाले, " जाता येइल पण पोलिस मारतात ना". कोण म्हणाले गाडीभाडे आमचा रोज वगैरे जाऊन परवडेल का". एका शेतकरी गटाने पुण्यात अशी माल विक्री सुरु केल्याचे समजले. त्याच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आता इतकी मागणी आली आहे की तो माल जमा करता करता आमच्या तोंडला फेस आला आहे. अनेकांनी, संध्याकाळ पर्यंत सांगतो, चौकशी करुन उद्या सांगतो असे सांगितले पण अद्याप कोणाचाच फोन आला नाही.
शेतकरी संपाच्या काळात, " शेतकर्यांनी माल नाही दिला तर आमचे काही अडत नाही, आम्ही परदेशातुन आयात करू" अशी धमकी भाजपाचे नेत माधव भंडारी यांनी जाहीरपणे एका चर्चेत दिली होती. आता करा म्हणावी आयात, कुठुन करता ते. शेतकर्यांना सतत लुटले गेले. आज्ञानी व असंघटीत असल्यामुळे तो नशिबाला दोष देत तोटा सहन करत राहिला. नाहीच सहन झाले तर फाशी घेतली पण शेती करणे बांद केले नाही. चालू परिस्थितीत जर शेतकर्यांनी संप करायचे ठरवले तर इंडियातले लोक आन्नावाचुन तडफडुन मरतील पण आम्ही तसे करणार नाही. हे देशावरचे संकट आहे याची जाणिव आम्हाला आहे. पावसाळ्याच्या तोडावर सफाई कामगार संप करतात, दिवाळीच्या तोंडावर बसवाले संप करतात. महामारीच्या तोडावर डॉक्टर संप करतात पेशंट मेले तरी संप चालू राहिलेलेआहेत हे आपण पाहिलेआहे. पण शेतकरी तसे करणार नाही.
शेतकरी हा दाताच आहे. आज ही अनेकांनी आपल्या खळ्यावरची धान्याची रास गरजूंसाठी मोफत खुल्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आम्ही रानात जेवायला बसलो अन् एखादी व्यक्ती रस्त्याने चालताना दिसली तर हाक मारतो, " या पाहुणं जेवायला." आलातर आपल्यातली आर्धी आनंदाने त्याला देतो. एखादं अनोळखी कुत्र जर येउन उभं राहिलं तर त्याला चतकोर भाकरी टाकतो. आलेल्या पाहुण्यना पिशव्या भरुन वानोळा देण्याची पद्धत गावातून आद्याप लुप्त झालेली नाही. पाखरांचा वाटा अाहे म्हणुन, ज्वारीची काढणी संपताना काही ताटे रानात उभी ठेवण्याची प्रथा आहे. घरातल्या हलकडीला शेलकी कणसे टांगली जातात. शेतकरी गरीब नाही त्या गरीब केलं गेलय, गरीब ठेवलं गेलय. स्व. शरद जोशींनी याची अर्थ शास्त्रीय मांडणी करुन सरकारशी लढा दिला परंतू गरिबांचे भले करण्याच्या नावाखाली स्वत:चे भले करुन जनता गरीब ठेण्याचे कारस्थान काही बंद झाले नाही.
यात शहरी ग्राहकांचा दोष नाही, व्यवस्थेचा दोष आहे. शेतीमालावर असंख्य बंधणे घालुन शेतकरी व ग्राहकांचे संबंध प्रस्थापित होउच दिले नाहीत. यात शेतकरी व ग्राहकांची, दोघांची लूट होत आहे. आम्हाला कमी दर अन् तुम्हाला महाग शेतीमाल. यातुन कायमचे बाहेर पडयचे असेल तर ग्राहक व शेतकर्यांनी एकत्र येउन ही व्यवस्था उलथुन टाकली पाहिजे.
संत कबीर एका दोह्यात म्हणतात, किसान जैसा दाता नही, लाथ सिवाय देता नही. संत कबीर असे का म्हणाले माहीत नाही पण शेतकर्याच्या नशिबी कायम लाथा खाणेच आले. कबिरांचे वचन सत्य करायचे असेल तर शेतकर्यांनी व ग्राहकांनी या लुटीच्या व्यवस्थेला लाथा घालायला सुरुवात केली पाहिजे.
२९/३/२०२०.
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना.