पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कोरोना बदलापूर पर्यंत आल्याने रायगड हद्द बंद करण्याची मागणी
ठाणे जिल्ह्यातील वाहनांची सतत वर्दळ
कर्जत,ता.12 गणेश पवार
कोरोना चा विषाणू रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे.असे असताना रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या जिल्हा हद्दीवर चौकी बसविण्यात आली आहे. मात्र असे असताना मोठ्या प्रमाणात वाहने कर्जत तालुक्यात येत असून कोरोना शेजारच्या बदलापूर मध्ये पोहचला आहे.त्यामुळे जिल्हा हद्द बंद करण्याची वेळ आली असून कोरोना पासून कर्जत तालुक्याला वाचविण्यासाठी प्रशासनाने जिल्हा हद्द बंद करण्याची मागणी केली.दरम्यान,ठाणे जिल्ह्यातून वाहने येणे सुरूच असून तालुक्यातील सर्व बँकांत येणारे कर्मचारी देखील ठाणे आणि मुंबईतुन येत असल्याने कोरोना ला रोखणार कसे ?असा प्रश्न निर्माण सामान्यांना पडला आहे.
रायगड जिल्हा हद्द ही कर्जत तालुक्यात शेलू आणि कळंब येथे जिल्हा हद्दी आहेत.त्या दोन्ही हद्दी रायगड पोलिसांनी सील केल्या असून आवश्यकता असलेल्या वाहनांना फक्त जिल्हा हद्द ओलांडू दिली जाते.मात्र शेजारच्या मुरबाड येथे कोरोना चा रुग्ण सापडला होता,त्यानंतर आज धक्कादायक माहिती पुढे आली असून कर्जत तालुक्याला सर्वात जवळची नागरी वसाहत असलेल्या बदलापूर मध्ये कोरोना चे एकाहून अधिक रुग्ण सापडले आहेत.मुरबाड हे कर्जत तालुका आणि जिल्हा हद्दीपासून बऱ्याच अंतरावर असून त्या भागात 90 टक्के जंगल भाग आहे,तर बदलापूर हे कर्जत तालुका आणि जिल्हा हद्दीपासून जेमतेम 12-13 किलोमीटर वर आहे.त्यामुळे कोरोना कर्जतच्या वेशीवर आला असल्याने नेरळ मध्ये कल्याणच्या बाजारातून भाजीपाला आणि फळे येत असतात.त्याच भाजीपाला यांच्या माध्यमातून कोरोना कर्जत तालुक्यात येऊ शकतो.ही बाब सर्वत्र चर्चेला येऊ शकते आणि त्यामुळे आतापर्यंत अनेकांनी जिल्हा हद्द बंद करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
त्यात ठाणे जिल्ह्यातील किमान 300 च्या संख्येने वाहने दररोज कर्जत तालुक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.शेलू येथील जिल्हा हद्दीत असलेली चौकीमध्ये सुरक्षा यंत्रणा प्रत्येक गाडीला अडविले जाते,मात्र वेगवेगळ्या प्रकारचे पासेस दाखवून वाहने रायगड जिल्हा हद्दीत घुसत आहेत. त्यामुळे त्या जिल्हा हद्दीवर येणारी व्यक्ती निर्जंतुक होऊन पुढे जावी यासाठी त्या ठिकाणी निर्जंतुकी करण कक्ष उभारण्याची मागणी शेलू गावातील पोलीस पाटील मनोज पाटील यांनी केली आहे. तर कर्जत तालुक्यातील विविध सरकारी आणि निमसरकारी बँका या लॉक डाऊन मध्ये सुरू असून त्या ठिकाणी काम करणारे बहुतेक कर्मचारी हे आपली वाहने घेऊन ठाणे,कल्याण,नवी मुंबई आणि मुंबईमधून देखील येत असतात.त्यामुळे जिल्ह्या बाहेरून येणारी वाहने,त्यातील माणसे, भाजीपाला यातून कोरोना कर्जत तालुक्यात घुसू शकतो हे स्पष्ट आहे.त्यामुळे लॉक डाऊन वाढण्याची शक्यता असताना रायगड जिल्हा हद्द 100 टक्के बंद राहणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून कोरोना कर्जत च्या वेशीवर आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.