समजुन घे ना मला*  ’’ ( *सुखी संसाराचे रहस्य* ) *डॉ. दत्ता कोहिनकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


‘‘ *समजुन घे ना मला*  ’’
( *सुखी संसाराचे रहस्य* )
*डॉ. दत्ता कोहिनकर*
गिरिजा व प्रसाद - मुंबईला नात्यातील कार्यक्रमासाठी सकाळी लवकरच डेक्कन एक्सप्रेसने निघाले. निघण्यापूर्वी दोघांनीही घरी न्याहारी केली होती. पोहे खाल्ले होते. गिरिजा ही पित्तप्रधान प्रकृतीची व प्रसाद हा कफप्रधान  प्रकृतीचा होता. पित्तप्रधान प्रकृतीमुळे गिरिजाचा जठराग्नी चांगलाच प्रदीप्त होता. दोन तासातच तिला परत भुक लागली. कफप्रधान प्रवृत्तीच्या प्रसादची पचनक्रिया जठराग्नी मंद असल्यामुळे हळूवार चालली होती.कर्जतला गिरिजाने प्रसादकडे वडापाव घेण्याची मागणी केली. प्रसादला भुक नसल्याने त्याने फक्त गिरिजालाच वडापाव घेऊन दिला. तद्नंतर दादर जवळच गिरीजाने परत सँडवीच खाण्याची इच्छा व्यक्त केली. प्रसाद तिला म्हणाला ‘‘आपण दोघांनीही सकाळी बरोबरच न्याहारी केली तू त्यानंतर वडापाव खाल्ला. आता परत सँडवीच घेण्याची मागणी करतेय. तोंडावर जरा बंधन घाल. किती खव-खव करतेस ? मुंबईत गेल्यावर चांगल्या उपहारगृहात काही तरी चांगलं खाऊ. आपल्या खाण्यावर टीका करणार्‍या प्रसादचा गिरीजाला खूप राग आला व त्यांची तूतू-मैंमैं होऊन रूसवा-फुगवी झाली व दिवस खराब गेला. प्रसादला जर हे कळलं असतं कि *पित्तप्रधान प्रकृतीच्या लोकांचा जठराग्नी प्रदीप्त असतो. त्याचं अन्नपचन लवकर होत असल्यामुळे त्यांना वारंवार भूक लागते हे नैसर्गिक आहे. तर हा वाद झालाच नसता*.सचिन व हेमा अत्यंत प्रेमळ जोडपं. सचिन वातप्रधान प्रकृतीचा तर हेमा कफप्रधान प्रकृतीची. कफप्रधान प्रकृतीची लोकं स्थूल असून हळूहळू-डुलत-डुलत चालतात, तर वातप्रधान (वारा) प्रकृतीची लोक शारिरिक हालचाली जलद, वेगाने करतात. जलद चालतात. वातप्रधान प्रकृतीचा सचिन चालताना हेमाच्या बरोबर चालता-चालता भरकन पुढे निघून जायचा. त्यामुळे मी तुम्हाला शोभत नाही म्हणून तुम्ही माझ्याबरोबर जोडीनं चालत नाही असा गैरसमज करून हेमा सचिन बरोबर वाद घालायची. अबोला धरायची, भांडणे करायची, *वात प्रकृतीची लोक जलद चालतात हे हेमाला ठाऊक असते, तर कदाचित त्यांची भांडणे टळली असती*. स्त्रीया संपूर्ण दिवसात देहबोली व हावभाव धरून सुमारे 20 हजार शब्द बोलतात. तर पुरूष संपूर्ण दिवसांत 7 हजार शब्द बोलतो. हा फरक दिवस संपताना अगदी प्रकर्षाने जाणवतो. पुरूष हा दिवसभर घराबाहेर 7 हजार शब्दांचा साठा संपवून घरी येतो. स्त्री दिवसभर जर घरीच असेन तर तिचा शब्दसाठा खुप शिल्लक असतो. नाईलाजाने त्या उरलेल्या शब्दांचा भडिमार घरात आलेल्या नवर्‍यावर होतो. त्याची बोलायची इच्छा, शब्दसाठा संपल्यामुळे अजिबात नसते. तिला मात्र काय बोलू-किती बोलू असं होतं. नवरा ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्यामुळे बायकोला त्याच आपल्यावर प्रेमच नाही असं वाटतं व समीकरण बिघडायला सुरवात होते.*पुरूषाचा नैसर्गिक शब्दसाठा 7 हजारच असतो याचे वैयक्तिक ज्ञान जर पत्नीला असते तर ही भांडणे टळली असती. *अठ्ठयान्नव टक्के घरी बसणार्‍या बायका आपल्या पतीला कमी बोलण्याच्या आरोपवरून दोष देत असतात*. आपल्या मागच्या पिढीला ही समस्या नसायची. नवरा नाही बोलला तरी एकत्र कुटूंबात खूप माणसं खुप मुल असायची. तिचा 20 हजार शब्दांचा साठा पूरा व्हायचा पण आताच्या घरी बसणार्‍या बायकांना एकांतवास छळतो. घरात कोणी बोलायला नसतं. आजूबाजूला असलेल्या घरांना कुलूप किंवा जाण्याची प्रथा नसते. मोबाईलवर बोलून देखील हा शब्दांचा साठा पूर्ण होत नाही. त्यामुळे कुचंबणा झालेली स्त्री नवर्‍यानं प्रतिसाद न दिल्याने हा शब्दांचा साठा पुर्ण होत नाही, निराश होते व बोलण्याची स्वाभाविक-नैसर्गिक इच्छा पूर्ण न झाल्याने संबंध बिनसतात.जेव्हा स्त्री आणि पुरूष त्यांच्यातील शारिरिक फरक जाणून घेत नाहीत तेव्हा त्यांच्यातील नातेसंबंध अयशस्वी होतात, ते विनाकारण एकमेकांवर अपेक्षाचं आझें लादतात व अकारण आपल्या आवडीनिवडी,प्राधान्यसवयी सारख्या असाव्यात असा आग्रह धरतात. म्हणून *आपल्या जीवनसाथीला निसर्गनियमाला अनुसरून स्पेस व स्वातंत्र्य द्या*. संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच. रूसवा-फुगवा तर होणारच, त्यावेळेचं एकमेकांना समजून घेत घेत एवढंच म्हणा. तुम रूठी रहो,मैं मनाता रहूं,के मजा जिने का - और कुछ आता है।संसार  हे सुखदुःखाच मिश्रण आहे. अहंकाराला तिलांजली देऊन जुळवून घेण्याची मानसिकता प्रत्येकाने ठेवली तर जीवनवेलीवरच्या फुलांना बहर येईल. संसारात वाद नसावा, संवाद असावा. कवयत्री बहिणाबाई म्हणतात ना, *अरे संसार संसार । जरी वरतूनी काटे ।आता परंतु दिसतील । चिकने रे सागरगोटे* । 🌹
एकमेकांना समजुन घ्या व आनंदी रहा. *एकटेपणाच दुःख कोणाच्याही वाटयाला न येवो ही प्रार्थना* .🙏
(*मी लिहलेल्या मनाची मशागत या पुस्तकातून* )
kohinkarpatil3@gmail. com