झोपड्यांमधील गोरगरीब जनता अन् त्यांच्या भवितव्याचा विचार करा; रतन टाटांचा सरकारला सल्ला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


झोपड्यांमधील गोरगरीब जनता अन् त्यांच्या भवितव्याचा विचार करा; रतन टाटांचा सरकारला सल्ला
__________________________________


एकमेकांना खेटून असलेल्या झोपड्यांमध्ये लोकांना वास्तव्यासाठी ना पुरेशी जागा आहे, ना शुद्ध हवा. विकासक पुनर्विकासाच्या नावाखाली तिथे आलिशान इमारती उभ्या करतात आणि झोपडपट्टीवासीयांना दूरवर गगनचुंबी झोपड्यांमध्ये फेकतात. तिथेही त्यांना किमान पायाभूत मिळत नाहीत. कच-यासारखे एकत्र ठेवून जगणे अवघड झालेल्या लोकांना समाज संबोधले जाते. ही लाजिरवाणी बाब असल्याचे परखड मत सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले.    


फ्यूचर आँफ डिझाईन अँण्ड कन्स्ट्रक्शन या विषयावर सोमवारी पार पडलेल्या एका वेबिनारमध्ये रतन टाटा संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रातील झोपड्यांमध्ये वास्तव्याला असलेली गोरगरीब जनता आणि त्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. कार्यालयांमध्ये सफेद शर्ट आणि टाय घालून काम करणारे अनेक जण झोपड्यांमध्ये राहतात. या सर्वांना नव्या भारताच्या जडणघडणीत सहभागी व्हायचे आहे. मात्र, विकासक आणि नियोजनकर्ते जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यात धन्यता मानतात. त्यांना दर्जेदार आयुष्य जगता यावे यासाठी सरकारनेही तातडीने लक्ष द्यायला हवे. ते प्रयत्न दिखाऊ आणि वरवरचे नसावेत. नागरी जीवन जगणाची काही मानके असतात त्यांच्या पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचेही टाटा यांनी नमूद केले.


धारावीच्या झोपडपट्टीत एकरी १२०० लोकांचे वास्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीला फक्त ३४ चौरस फूट जागा उपलब्ध होते. अनेक झोपडपट्ट्यांची तीच अवस्था आहे. गरीबांना कच-याप्रमाणे ‘डंप’ केले जाते. या झोपड्यांच्या पुनर्विकासाचे धोरण बदलण्याची नितांत गरज असल्याचे मत डेला गृपच्या जीमी मिस्त्री यांनी व्यक्त केले. तर, नियोजनकर्त्यांनी सामाजीक कार्यकर्त्याप्रमाणे काम करून समस्यांची तीव्रता कमी करायला हवी असे मत रीच आर्किटेक्टच्या पीटर रीच यांनी व्यक्त केले. तसेच, गरिबांना केवळ घरे नाही तर पायाभूत सुविधांची सुध्दा गरज असते याचा विसर पडता कामा नये असेही त्यांनी नमूद केले. या आँनलाईन परिसंवादात पाच हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते अशी माहिती काॅर्पजीनीचे सहसंस्थापक अमित जैन यांनी दिली


आता जागे व्हा -


कोरोनाच्या संकटामुळे दाटिवाटीच्या क्षेत्रांबद्दलची काळजी आणखी वाढली आहे. हा वेकअप काॅल असून आता तरी आपण जागे झाले पाहिजे. इथले रहिवासी नवीन भारतचाच एक भाग आहेत हे मान्य करून झोपड्यांचा अभिमान वाटेल अशा पद्धतीने पुनर्विकास व्हायला हवा. त्यांची लाज बाळगण्याचे कारण नाही असेही रतन टाटा त्यांनी नमूद केले.