पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आणखी एक महाभयंकर संकट घेऊन येतोय; संयुक्त राष्ट्राचा इशारा
________________________________
कोरोना व्हायरसमुळे मोठमोठे देश ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थचक्रच बंद पडल्याने लोकांसमोर बेरोजगारीची मोठी समस्या उभी राहिली आहे. यामुळे जगभरात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा मोठा धोका आहे. याचबरोबर कोरोना आणखी एक मोठे संकट घेऊन येत आहे. याचा इशारा युएनने दिला आहे.
जगातील अनेक देशांमध्ये अन्नपाण्याची प्रचंड टंचाई भासणार आहे. यामुळे अख्ख्या जगासमोर उपासमारीचे मोठे संकट आवासून उभे राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मोठ्या दुष्काळाचाही सामना करावा लागणार आहे. हा इशारा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक खाद्य योजनेच्या प्रमुखांनी दिला आहे.
WFP चे प्रमुख डेविड बेस्ले यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे १३.५० ते २५ कोटी लोक उपाशीपोटीच मरण्याची शक्यता आहे. जगाला उद्धवस्त होण्य़ापासून वाचविण्यासाठी सर्व देशांना एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.
भूकबळींचा धोका येमेन, कांगो, अफगाणिस्तान, व्हेनेझुएला, इथिओपिया, दक्षिण सुदान, सिरिया, नायजेरिया या देशांना अधिक असणार आहे. हे देश युद्ध, आर्थिक संकट आणि जलवायू परिवर्तनासारख्या संकटांना तोंड देत आहेत. डेविड बेस्ले यांनी हा इशारा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये दिला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलत होते.
जगाला बुद्धीने आणि वेगाने या संकटावर आधीच उपाययोजना करायला लागणार आहे. कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीय. एकत्र येऊन कोरोनाला त्यासाठी थोपवावे लागेल असेही त्यांनी सांगितले. WFP एकट्यानेच १.२ कोटी येमेनींना जेवण पुरविते. तसेच दक्षिण सुदानमध्ये ६१ टक्के लोकांना एकवेळचे जेवणही मिळत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.