कोरोना मुळे मसाले बनविणे बनले कठीण?महिला टेन्शन मढगे  मिरचीचे भाव वाढल्याने आणि ग्राहक नसल्याने व्यापारी हवालदिल... घाऊक व्यवसायीक संकटात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना मुळे मसाले बनविणे बनले कठीण?महिला टेन्शन मढगे 

मिरचीचे भाव वाढल्याने आणि ग्राहक नसल्याने व्यापारी हवालदिल... घाऊक व्यवसायीक संकटात

कर्जत,ता.13 गणेश पवार

                            रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील बाजारपेठ मसाले बनविण्यासाठी लागणाऱ्या मिरचीसाठी मोठी बाजारपेठ समजली जाते.पुणे,ठाणे,पालघर,रायगड आणि मुंबई या जिल्ह्यातील चवदार आणि चविष्ट खाणारे खवय्ये यांच्यासाठी कर्जतच्या बाजारातील मिरचीला महत्व आहे.दरम्यान,या वर्षी कोरोना मुळे बाजारपेठ मंदावली असून मिरची खरेदी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिला घराबाहेर पडत नसल्याने ग्राहक नाही.त्यात हैद्राबाद गंटूर वरून येणारी मिरची यावर्षी जास्त भाव खात आहे,त्यामुळे मिरची ची घाऊक व्यवसाय करणारे संकटात सापडले आहेत.जर लॉक डाऊन उठले नाही तर मिरची पडून राहील आणि लाखोंचे नुकसान होईल अशी भीती 50 वर्षाचा अनुभव असलेले व्यापारी बोलत आहेत.

                             जानेवारी-फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली की महिलांना वेध लागतात ते पावसाळ्यात लागणा-या वस्तुंची साठवण करण्याचे.घरच्या सुगरण असलेल्या महिला मंडळीला लवकरात लवकर तिखट मसाला करण्याचे वेध लागले आहेत. जेवणातील महत्वाचा घटक भाजी आणि भाजीसाठी लागणारा मसाला महिला स्वत: जातीने लक्ष देवून बनवून घेतात.वेगवेगळ्या प्रकारच्या मिरची साठी कर्जतची बाजारपेठ ओळखली जाते. महाराष्ट्रातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या कर्जतच्या बाजारपेठेत विकली जाणारी मिरची ही प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून येते. कर्जत च्या मिरची गल्लीत जेवणात तिखट मसाल्याचे विशेष आकर्षण असलेले खवय्ये प्रामुख्याने मिरची खरेदी साठी येतात.मुंबई,ठाण्यापासून, पालघर आणि बदलापुर,डोंबिवली, कल्य़ाण,पनवेल,नवी मुंबई या भागातील आगरी-कोळी लोक मच्छी-मटण या पदार्थांची लज्जत वाढविणारे मसाले बनविण्यासाठी कर्जतची बाजारपेठवेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या खरेदी करण्यासाठी जानेवारी पासून गर्दी करतात. मिरची सोबत मसाल्याचे पदार्थ त्यात हळद, गरम मसाले यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. 

                              पुर्वी कर्जत बाजार पेठेत मिरची विक्रिची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. त्या मानाने मिरचीची विक्री करणारी दुकाने कमी झाली आहेत.मात्र जी दुकाने आहेत त्यामध्ये नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असते.यावर्षी चित्र वेगळे असून कर्जत ची काय सर्व बाजारपेठ बंद आहेत.किराणा दुकाने उघडी आहेत,पण मिरची खरेदी साठी बाहेर पडणाऱ्या महिला यावर्षी कोरोना च्या भीतीमुळे घरातच बसून आहेत.त्यामुळे मिरची खरेदी करण्यासाठी घाऊक दुकानात येणाऱ्या महिला यांची गर्दी तुरळक अशीच आहे. दुसरीकडे मिरची घरी नेऊन त्या मिरचीला उन्हात सुकवावे लागते,तसेच त्या मिरची ची बोंडे देखील काढावी लागतात.त्यामुळे आता सुरू झालेला एप्रिल महिना लक्षात घेता मिरची ची दुकाने तशी म्हणायला गेली तर ओस पडली आहेत.त्यामुळे यावर्षी मिरची ची बाजारपेठ फुलणार नाही हे देखील जवळपास निश्चित आहे.त्यामुळे मिरचीचे उत्पादन होत असलेल्या गंतूर मधून माल कर्जतच्या बाजारात येऊन पडला आहे,पण त्याला मागणी नसल्याने व्यापारी आर्थिक संकटात येऊ शकतात.

                                  कर्जतच्या मिरची गल्लीत शंकेश्वरी,गंटूर, लवंगी, अंकुर, काश्मिरी,ढोबळी, तेलपरी,बेडगी,या जातीची मिरची विक्रीसाठी येते.महागाईचा विचार करता सर्व प्रकारच्या मिरच्या यांचे भाव वाढले आहेत.त्याचा परिणाम देखील मिरची खरेदी वर होऊ शकतो.