सत्यमेव जयते. शोध राष्ट्रीय चिन्हाचा आणि राष्ट्रीय ब्रिदवाक्याचा.  भन्नाट माहिती आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सत्यमेव जयते.
शोध राष्ट्रीय चिन्हाचा आणि राष्ट्रीय ब्रिदवाक्याचा. 
भन्नाट माहिती आहे. वाचून आनंद घ्यावा. 
सारनाथचे मौर्यकालीन चार सिंह हे आपले राष्ट्रीय चिन्ह. 
आणि ह्या राष्ट्रीय चिन्हाच्या खाली लिहिलेले 'सत्यमेव जयते' हे आपले राष्ट्रीय ब्रिदवाक्य.
२६ जानेवारी १९५० साली आपल्या भारत देशाने पहिल्या प्रजासत्ताकदिनी (Republic Day) सारनाथचे 'चार सिंह' हे आपले 'राष्ट्रीय चिन्ह' आणी 'सत्यमेव जयते' हे 'राष्ट्रीय ब्रीदवाक्य' म्हणून घोषित केले. 
सारनाथचे चार सिंह ह्या आपल्या राष्ट्रीय चिन्हाला इंग्रजीत आपण National Emblem  असे म्हणतो. 
आणी 'सत्यमेव जयते' ह्या राष्ट्रीय ब्रीदवाक्याला इंग्रजीत आपण National Motto  असे म्हणतो. 
आधी आपण 'सत्यमेव जयते' ह्या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा शोध घेऊ. 
आणी मग सारनाथचे चार सिंह असलेल्या राष्ट्रीय चिन्हाचा. 
**
'सत्यमेव जयते' या मंत्राचे मूळ अथर्ववेदाच्या शौनकीय शाखेशी संबंधित मुंडकोपनिषदातील श्लोकामध्ये आहे. तो मंत्र खालीलप्रमाणे:-
सत्यमेव जयते नानृतम् सत्येन पन्था विततो देवयानः ।
येनाक्रमत् मनुष्यो ह्यात्मकामो यत्र तत् सत्यस्य परं निधानं ॥ 
ह्या श्लोकाचा अर्थ आहे: सत्याचाच विजय होत असतो, न कि अ-सत्याचा. सत्य हा तोच दैवी मार्ग आहे ज्या मार्गावरून गेल्यास मनुष्य आप्तकाम बनतो. (आप्तकाम: जीवनातील सर्व कामना पूर्ण झाल्या आहेत असा) हेच सत्याचे परम धाम आहे. 
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
आता वरील माहितीत मुंडकोपनिषद म्हणून शब्द आहे. 
ह्याचा अर्थ सांगतो.
ह्या शब्दाची फोड अशी आहे: मुंडक -उपनिषद
मुंडक- शीर. ज्यास आपण मुंडक असेही म्हणतो. शिरा शिवाय शरीर नाही. त्याच अर्थी मुंडकोपनिषदाशिवाय ब्रम्हज्ञान नाही. 
उपनिषद 
(उप + नि + सद ) म्हणजे गुरूजवळ बसून मिळविलेली विद्या. 
एकूण १०८ उपनिषदे आहेत. ह्यापैकी १० उपनिषदे मुख्य मानली जातात. ह्यातही अभ्यासकांमध्ये मत-मतांतरे आहेत.
ईशोपनिषद: मानव जीवनाची मूळ कर्तव्ये, ज्ञान अज्ञान,  यम-नियम, विद्या अविद्या प्राप्ती- प्रकृती, कार्य कारण, सत्य, धर्म, कर्म ह्यांची माहिती ह्यात आहे.
केनोपनिषद: ह्या सर्वसृष्ठी पाठीमागे कोण आहे? केनोपनिषदात ब्रह्मज्ञान कसे प्राप्त करावे ह्याचे विवेचन आहे. 
उदा. खालील श्लोक पहा. 
केनेषितं पतति प्रेषितं मनः, केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः I
केनेषितां वाचमिमां वदन्ति, चक्षु: श्रोत्रं क उ देवो युनक्ति II
अर्थात; कोणामुळे प्राण शरीरातून वाहतो, मन म्हणजे काय? कोणामुळे वाणी बोलते? कोणामुळे नेत्रांनी पाहता येते वा कोणामुळे ऐकता येते? ह्या व अशा प्रश्नांवर आधारित भाष्य केनोपनिषदात आहे.
कथोपनिषद: ह्या यजुर्वेदीय उपनिषदात, ऋग्वेदातील एका कथेच्या आधाराने प्रश्नोत्तर आहेत. भगवद्गीतेतील बराचसा भाग ह्या उपनिषदाशी मिळता जुळता आहे.
प्रश्नोपनिषद: विविध तत्वज्ञानसंबंधी प्रश्न व त्याचे उत्तर म्हणजेच प्रश्नोपनिषद.
मुंडकोपनिषद: ह्यात ब्रम्ह विद्येचे विवेचन आत्मा परमात्माची तुलना आणि समता ह्याचे वर्णन आहे. 
माण्डूक्योपनिषद: ह्यात आत्मा आणि चेतना ह्यांच्या चार अवस्थांचे वर्णन आहे. जागृत, स्वप्न, सुश्रूप्ती म्हणजे प्रगाढ निद्रा आणि तुरीय म्हणजे सत्य हेच अंतिम स्वरूप आहे अशी माहिती ह्यात आहे. 
ऐतरेय उपनिषद: हे उपनिषद ऋग्वेदासंबंधी आहे. जीवनावरील भाष्य, प्रश्न, विविध अवयव व त्यांचे कार्य ह्यात चर्चिले गेले आहेत.
तैत्तरेय उपनिषद: तीन भागात असलेल्या ह्या उपनिषदात पहिल्या भागात वाणी, उच्चार, व्याकरण ह्याबद्दल चर्चा तर दुसर्‍या व तिसर्‍यात परमार्थ ज्ञान ह्या संकंल्पनेवर चर्चा केलेली आढळते.
छांदोग्योपनिषद: सामवेद व छांदोग्य याचा मिलाफ होऊन हे उपनिषद तयार झाले आहे. 'ॐ', 'भू:', 'भुव:', 'स्व:' तथा 'मह:' मंत्रांचा महिमा ह्यात वर्णन केलेला आहे. कर्माचे फल व पुनर्जन्मावरील भाष्य देखील ह्यात आढळते. मानव धर्म, त्याचे साध्य, ध्यानधारणा व ध्यानाचे रोजच्या जीवनातील महत्व ह्यावर विवेचन ह्या उपनिषदात आहे.
बृहदारण्यकोपनिषद: ह्या उपनिषदाचे तीन कांड आहेत. पहिल्या मधु कांडात माणसाची स्वतःची विश्वशक्तींशी ओळख ह्याची चर्चा आहेत. दुसर्‍या मुनीकांडात तत्वज्ञानावर भर आहे तर तिसर्‍या खिलकांडात उपदेश, उपासना, ध्यान व भक्ती ह्याचे विवेचन आहे.
ह्या सगळ्या उपनिषदांत ज्ञानाचे भांडार भरलेले आहे. उपनिषद साहित्यात प्राचीन भारतीय तत्त्वविचार आले आहेत. 
'सत्यमेव जयते' ह्या शब्दाला राष्ट्रीय दर्जा देण्याचे काम पंडित मदन मोहन मालवीय यांनी इ.स. १९१८ मध्येच केले होते. 
१९०९ साली पंडित मदन मोहन मालवीय हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले. संस्कृतचे गाढे अभ्यासक असल्यामुळे पंडित मदन मोहन मालवीय ह्यांनी 'सत्यमेव जयते' चा अर्थ लोकांना समजावून सांगितला. पंडित मदन मोहन मालवीय ह्यांनी स्वातंत्र्य संग्रामात 'सत्यमेव जयतेचा' नारा दिला. 'सत्यमेव जयते' शब्दाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवीन ऊर्जा आणि दिशा मिळाली. 
'सत्यमेव जयते' हा शब्द सर्वतोमुखी करण्याचे महत्तम कार्य पंडित मदन मोहन मालवीय ह्यांनी केले होते. आणी ह्याचाच परिणाम म्हणजे पहिल्या प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारी १९५० साली आपल्या भारत देशाने राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून 'सत्यमेव जयते' ह्या वाक्याची निवड केली. 
**
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
आता आपण आपल्या राष्ट्रीय चिन्हाचा शोध घेऊ. 
सारनाथचे चार सिंह हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे. ह्याला इंग्रजीत National Emblem  असे म्हणतात. 
(सिंहचतुर्मुख हा जो शब्द काही लोक वापरतात तो व्याकरणदृष्टया योग्य नाही. एकाच सिंहाला चार तोंडे असतील तरच सिंहचतुर्मुख हा शब्द योग्य आहे. पण इथे चार सिंह हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे चार सिंह असाच शब्द योग्य आहे.)
चंद्रगुप्त मौर्याचा नातू असलेल्या सम्राट अशोकाने प्रजाहित आणी  धर्मोपदेश ह्यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरसपानी स्तंभांवर कोरून ठेवलेल्या आहेत त्यांना ‘अशोकस्तंभ’ म्हणतात. 
असे स्तंभ अशोकाच्या पूर्ण साम्राज्यात साम्राज्यभर विखुरलेले होते. चिनी प्रवासी श्विनझांग अशा पंधरा अशोकस्तंभांचा उल्लेख करतो. 
आणखीही काही स्तंभ असणे संभवनीय आहे. 
बहुतेक स्तंभ उत्तर प्रदेशातील चुनार येथील खाणीतल्या एकसंघ वालुकाश्मात घडविले असावेत आणि नंतरच ते दूरवर वेगवेगळ्या स्थळी हलविले असावेत. 
वालुकाश्म मुळातच विविधरंगी असल्याने हे स्तंभही साहजिकच वेगवेगळ्या रंगांत घडले गेले.  
उदाहरणार्थ उत्तर प्रदेशातील फारुकाबाद जिल्ह्यातील संकीसा येथील स्तंभ जांभळ्या रंगाचा आहे तर पूर्वी बनारस येथे असलेला स्तंभ हिरव्या रंगाचा होता. काही स्तंभ करड्या, पिवळ्या आदी रंगांचेही आढळतात. स्तंभांतील रंगांच्या विविधतेप्रमाणे स्तंभशीर्षांमध्येही वैविध्य दिसून येते. 
उत्तरप्रदेशातील बहराईच जवळील श्रावस्ती येथील जेतवन विहाराच्या पूर्व दरवाजाच्या बाजूंना असणाऱ्या दोन स्तंभांत अनुक्रमे चक्र व वृषभ अशी स्तंभशीर्षे आढळतात. 
बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील लौरिया-नंदनगढ़, नेपाळमधील रामपुर्वा व कपिलवस्तू येथील स्तंभांची शीर्षे सिंहाच्या वेगवेगळ्या प्रतीकात्मक रूपभेदांची असून, त्यांच्या शिल्पशैलींमध्येही विविधता व गुणवत्ता दिसते. 
बिहारमधील राजगीर (राजगृह) व उत्तरप्रदेशातील संकीसा येथील स्तंभशीर्ष हत्तीच्या आकाराचे आहे, तर नेपाळमधील रुपनदेहि (आजचे देवदह) येथील स्तंभशीर्ष अश्वाच्या आकाराचे होते. 
नेपाळमधील रामपुर्वा येथील वृषभ-स्तंभशीर्ष उल्लेखनीय आहे. स्तंभशीर्षांमधील प्राण्यांच्या मूर्तींत सारतत्त्वात्मक शिल्पांकन आढळते. स्तंभशीर्षांवरील कोरीव चित्रमालिकेत धार्मिक प्रतीके दर्शविलेली आहेत.
**
अशोकाच्या एकूण स्तंभांवरून तत्कालीन मौर्यकालीन मूर्तिकलेची भरभराट दिसून येते. त्यांतील सारनाथ स्तंभशीर्ष मौर्यकालीन मूर्तिकलेच्या अत्युच्च विकासाचे द्योतक समजले जाते. 
प्रसिद्ध संशोधक 'जॉन मार्शल' ह्याच्या मते सारनाथ येथील खांबाच्या चार सिंहांचे काम हे जगातील सर्वात पहिल्या प्रतीचे आहे आणि सर्व मौर्यकालीन शिल्प, हे ग्रीक (अथेनियन) शिल्पांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहे.
भारतीय विद्यांचा अभ्यासक असलेल्या 'व्हिन्सेंट आर्थर स्मिथ' याने म्हंटले आहे कि, "अशोकाचे शिलास्तंभ तर ४०।४० फूट उंचीच्या गुळगुळीत व एकसंधी दगडाचे आणि उत्तम कारागिरीचे आहेत. 
शिलालेखाच्या शिला तर काचेप्रमाणे चकचकीत आहेत. 
हे प्रचंड शिलास्तंभ उचलून दूर अंतरावर नेण्यात 'एंजिनियरिंगची' जरूरी असते व ती कला मौर्यकालीन लोकांना माहीत होती. उठावदार चित्रे खोदण्यातहि मौर्यकालीन लोक तरबेज होते. अशोकाच्या अंकित लेखांवरून त्याच्या प्रजेच्या साक्षरतेचे प्रमाण सांप्रत हिंदुस्थानच्या लोकांपेक्षा जास्त होते." 
**
सर्वच अशोक स्तंभांच्या विषयी विस्तृत माहिती मिळत नाही. ज्यांची विस्तृत माहिती उपलब्ध आहे ती खालीलप्रमाणे:
सारनाथचा स्तंभ:  उत्तर प्रदेशातील वाराणसी पासून साधारण १० किलोमीटर दूर असलेल्या सारनाथ येथे इसवीसन पूर्व २५० मध्ये हा स्तंभ बनविला गेला. सर्व अशोकस्तंभांत सारनाथ येथील स्तंभास सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या आगळे महत्त्व आहे. भारताने पहिल्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी १९५०) या स्तंभाचे शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले. 
ह्या जागी पूर्वी फार जंगल असल्याने मोरांची संख्या भरपूर होती. त्यामुळे ह्यास ऋषिपट्टण आणी मृगदाव असेही म्हणत. ह्या ठिकाणी भगवान बुद्धास ज्ञानप्राप्ती झाली व त्याने पहिले धर्म- प्रवचनही येथेच केले. तो  स्तंभ हरितमणी या अश्मविशेषाप्रमाणेच गुळगुळीत व चकचकीत दिसे. 
सातव्या शतका- नंतर केव्हातरी तो उद्‌ध्वस्त केला गेला असावा; कारण १९०५ मध्ये केलेल्या उत्खननात पुरातत्त्वसंशोधन-विभागास त्याचे फक्त स्तंभशीर्षच सापडले. ते दोन मी. उंचीचे असून सध्या ते सारनाथ येथील संग्रहालयात ठेवले आहे. 
(खाली चित्रात असलेले. )
यातील चार सिंहांवर पूर्वी जे धर्मचक्र बसविले होते, त्याचेही अवशेष याच संग्रहालयात ठेवलेले आहेत. ह्या स्तंभशीर्षावरील चार सिंह विशिष्ट मौर्यशैलीत कोरलेले असून त्यांखालील नक्षीदार बैठकीच्या कोरीव चित्रमालिकेत गतिमान अवस्थेत हत्ती, घोडा, बैल, सिंह व चोवीस आरे असलेले चार चक्र आहेत. त्याखाली उलटे कमळ कोरलेले आहे. 
सारनाथच्या स्तंभावर चार सिंह चार दिशांस बसलेले आहेत. ह्याशिवाय ह्याच स्तंभाच्या खाली असलेले चक्र हे आपल्या राष्ट्रीय ध्वजातही समाविष्ट केले गेले. ह्या अशोक स्तंभावर तीन लेख कोरलेले आहेत. ह्यातील पहिला लेख खुद्द अशोकाच्या कालीन ब्राम्ही लिपीत कोरलेला आहे. ह्या शिवाय दुसरा लेख हा कुशाण काळातील आणि तिसरा लेख हा गुप्त काळातील आहे. 
अलाहाबादचा स्तंभ: समुद्रगुप्ताने हा अशोकस्तंभ उत्तर प्रदेशातील कौशाम्बी येथून प्रयाग येथे आणला. समुद्रगुप्ताच्या दरबारी असलेल्या कवी हरिषेण द्वारा रचना केलेल्या 'प्रयाग प्रशस्ती' चे लेखन ह्या स्तंभावर केलेले आहे. 
उत्तरप्रदेशातील अलाहाबाद ह्याला प्रयागराज असेही नाव आहे. हा स्तंभ अलाहाबादच्या किल्याच्या बाहेर आहे. ह्या स्तंभाची पुनर्स्थापना अकबराने केली होते असेही म्हंटले जाते. ह्या अशोक स्तंभाच्या बाहेरील बाजूस अशोकाचा अभिलेख लिहिलेला आहे. 
ह्यांत १६०५ मध्ये मुघल बादशहा जहांगीर ह्याचे राज्यारोहण वर्णन ह्या स्तंभावर कोरण्यात आले. 
अशीही एक वदंता आहे कि १८०० मध्ये ह्या स्तंभाला पाडण्यात आले होते. परंतु १८३८ मध्ये इंग्रजांनी पुन्हा ह्या स्तंभाला उभे केले. 
वैशालीचा स्तंभ: हा स्तंभ बिहार मधील वैशाली येथे आहे. असे मानले जाते कि कलिंग विजय मिळविल्यानंतर अशोक बौद्ध धर्माकडे आकर्षिला गेला. कलिंग हे आजचे ओरिसा आणी आंध्र प्रदेशच्या उत्तर भागावरील प्रसिद्ध राज्य होते.  भगवान बुद्धाने बिहार मधील वैशाली येथे आपला अंतिम उपदेश दिला होता त्यामुळे त्या आठवणी खातर हा स्तंभ येथे उभा करण्यात आला. 
हा स्तंभ इतर स्तंभांपेक्षा थोडा वेगळा आहे. स्तंभाच्या शीर्षावर त्रुटीपूर्ण पद्धतीने सिंहाची आकृती बनविलेली आहे. हा सिंह उत्तर दिशेस पाहत आहे. उत्तर दिशेला भगवान बुद्धाची अंतिम यात्रेची दिशा मानतात. त्यामुळे हा सिंह उत्तर दिशेकडे पहात आहे असे काही इतिहासकार मानतात. ह्या स्तंभाच्या बाजूला विटांनी बनविलेला स्तूप आणि एक पाण्याचे तळे आहे. ह्या तळ्याला रामकुंड असेही म्हणतात. 
दिल्लीचा स्तंभ: हा स्तंभ कुतुबमिनार परिसरात स्थापित आहे. हा स्तंभ १३.१ मीटर उंच आहे. अशी मान्यता आहे कि सुरवातीस हा स्तंभ मेरठ येथे होता. 
फिरोजशहा तुघलक जेंव्हा १३६४ साली मेरठ येथे आला तेंव्हा त्याच्या नजरेस हा स्तंभ पडला. त्याला हा स्तंभ इतका आवडला कि त्याने ह्या स्तंभाला मेरठ येथून दिल्लीला आणले. 
मी जेंव्हा भेट दिली होती त्या वेळेस ह्या स्तंभाला स्पर्श करता यायचा. आता शासनाने त्यास तटबंदी केली आहे. 
सांची स्तंभ: हा स्तंभ मध्यप्रदेशातील सांची येथे आहे. हा स्तंभ सारनाथच्या स्तंभाशी बराच मिळताजुळता आहे. ह्या स्तंभावरही चार सिंह चार दिशांस एकमेकांकडे पाठ करून बसलेले आहेत. 
संकिशा स्तंभ:  उत्तर प्रदेशातील फ़र्रूख़ाबाद जिल्ह्यात हे संकिशा आहे. येथील स्तंभावर हत्तिचे शिल्प आहे. 
समाजकंटकांनी ह्या हत्तिची सोंड तोडलेली आहे. हा स्तंभ त्या वेळीही इतका चमकदार होता कि त्यावर पाणी पडल्यामुळे तो चमकत आहे असा भास व्हावा. 
चायनीज प्रवासी श्विनझांग ह्याने इथे ७० फूट उंच स्तंभ पाहिला होता. ज्यावर सिंहाची प्रतिमा होती. 
ह्या शिवाय नेपाळमधील निगाली सागर, ओरिसा येथील लुम्बिनी (रुम्मिनदेई), बिहारमधील रामपुरवा,लौरिया नंदनगढ़, चंपारण, लौरिया अराराज, आणी आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील अमरावती ह्या ठिकाणीही अशोक स्तंभ स्थापित आहेत. 
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
ब्राम्ही लिपी कशी वाचायची हे कालानुरूप लोक विसरून गेले होते. १८३७ साली 'जेम्स प्रिन्सेप' ह्या अभ्यासकाने अशोककालीन ब्राम्ही लिपी पुन्हा अभ्यासून (Decode) आत्मसात केली. ब्राम्ही शब्दांची बाराखडी वाचून समजून घेण्याचे काम जेम्सने केले. जेम्स प्रिन्सेप ह्याने घेतलेल्या कष्टामुळे आज आपण ब्राम्ही लिपी वाचू शकतो. 
ब्राम्ही लिपीच्या बाराखडीचे अजूनही नीट भाषांतर झालेले नाही आणी आपल्याकडे ब्राम्ही लिपी अजूनही पूर्ण स्वरूपात नाही असेही काही अभ्यासकांचे मत आहे.   
अत्यंत महत्वाचे: 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवस अथक मेहनत घेऊन भारतीय संविधान लिहिले होते. 
भारताचे चार सिंह असलेले राष्ट्रीय चिन्ह चित्रित करण्याचा मान मध्यप्रदेशातील इंदूर येथील प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ भार्गव ह्यांना मिळाला होता. 
शांतिनिकेतनचे कलागुरु असलेल्या नंदलाल घोष ह्यांचे दीनानाथ भार्गव हे आवडते शिष्य होते. 
जेंव्हा दीनानाथ भार्गव ह्यांनी आपल्या मूळ संविधानाचे मुखपृष्ठ तयार केले तेंव्हा ते विद्यार्थी होते. ह्या वेळी ते शांती निकेतन कला महाविद्यालयात फाईन आर्टचा डिप्लोमा करत होते. 
मूळ संविधानाचे डिझाईन बनविण्यासाठी चौदा कलाकारांची टीम बनविण्यात आली होती.  
दीनानाथ भार्गव संविधानाच्या कव्हर पेजवर  काम करत होते. ह्या वेळी त्यांनी ह्या डिझाईनमध्ये बरेच बदल केले होते. संविधानातील चित्रे हे सोन्याचे पाणी वापरून केली गेली. मूळ संविधान बनविल्यानंतर चाळीस वर्षांनी दीनानाथ भार्गव ह्यांना हे संविधान पाहण्याचा योग आला होता. 
महत्वाचे: संविधानावरील सारनाथचे सिंह हे द्विमितीय 2D प्रकारातील असल्याने पाहताना आपल्याला तीन सिंह दिसतात. वस्तुतः हे चार सिंह आहेत. 
दीनानाथ भार्गव हे सारनाथला जाऊन अशोक स्तम्भावरील सिंहांचा अभ्यास करायचे. ह्याशिवाय राष्ट्रचिन्हात सिंहांचे भाव जिवंत दिसावेत म्हणून ह्या सिंहाचे चित्र करण्याअगोदर दीनानाथ भार्गव हे रोज २ महिने कलकत्याच्या चिडियाघर मधील सिंह त्या सिंहाची मादी आणि सिंहाच्या बछड्याचे अवलोकन करत असत. दीनानाथ भार्गव ह्यांनी सिंहाचे हावभाव ह्यांच्या बरोबरच सिंहाच्या नखांचेही बारीक अध्ययन केले होते. 
मूळ सारनाथच्या स्तंभावर खालून वर पाहताना पहिल्यांदा उलटे कमळ आहे. 
त्यावर चक्र असून त्या चक्रात अनुक्रमे 'गतिमान अवस्थेत' घोडा-चोवीस आरे असलेले चक्र,  बैल-चोवीस आरे असलेले चक्र, हत्ती-चोवीस आरे असलेले चक्र, आणि सिंह-चोवीस आरे असलेले चक्र असे एकामागोमाग एक असे आहेत. 
ह्या चक्रावर चार सिंह चार दिशांस एकमेकांकडे पाठ करून बसलेले आहेत. 
महत्वाचे: 
राष्ट्रीय चिन्ह बनविताना सिंह चक्राखालील उलटे कमळ राष्ट्रीय चिन्हातून वगळण्यात आले. 
शिवाय मूळ सिंह स्तंभाखाली 'सत्यमेव जयते' हे लिहिलेले नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय चिन्ह बनविताना सिंह चक्राखाली 'सत्यमवे जयते' हे राष्ट्रीय ब्रीदवाक्य लिहिले गेले. 
तर असा हा राष्ट्रीय चिन्हाचा आणि राष्ट्रीय ब्रिदवाक्याचा शोध. 
(खाली पहिल्या दोन चित्रांत वाराणसी येथे उत्तखनन करताना सापडलेले सिंह, तिसऱ्या चित्रात मूळ भारतीय संविधान आणि चौथ्या चित्रात भारतीय संविधानात चित्रित असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणी गुरु गोविंद सिंहजी.) 
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर 
सतीश शिवाजीराव कदम 
निरंतर