विश्व स्वधर्म सूर्यें पाहो

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


विश्व स्वधर्म सूर्यें पाहो


विश्वाचा मानवतावादी कर्तव्यवादी धर्म सांगणारे ज्ञानेश्वर महाराज
आजही आम्हाला समजले नाहीत. या जगातील जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाने कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशाप्रती, या वसुंधरेच्या प्रती कर्तव्यपालन करणे हाच खरा धर्म आहे. 


दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
 जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥


दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांना सत्कर्मे करण्या मध्ये स्वारस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. 
पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. दुष्कर्म नाहीसे होऊन सर्व विश्व आपापल्या कर्तव्याच्या जाणिवेने कार्यरत असणे अपेक्षित आहे. इच्छा कोणतीही असो, ऐहिक वा आध्यात्मिक, व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनात त्यामुळे संघर्ष होता कामा नयेत. असे सज्जन सर्वांचे आप्त होवोत आणि विश्वात्मकाची उपासना करोत असा आशय यामध्ये आहे.