पत्रकारांवरील पोलिसांचे हल्ल्यांची मुख्यमंत्र्यांनी त्वरीत दखल घ्यावी - किसन हासे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


पत्रकारांवरील पोलिसांचे हल्ल्यांची मुख्यमंत्र्यांनी त्वरीत दखल घ्यावी - किसन हासे


मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूचे महाभयानक संकट कोसळले असताना शासकीय, सामाजिक, वृत्तपत्रीय सर्व संस्था एक दिलाने, एक विचाराने काम करीत असताना पोलिस दलाने मात्र दंडूकेशाहीचा नवीनच खाक्या सुरू केला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली नागरिकांच्या अडचणींची शहानिशा न करता शिस्तीच्या नावाखाली अमानुष मारहान काही ठिकाणी झाली आहे. या निषेधार्य प्रकाराची नोंद मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक व वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्वरीत घेवून अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या पत्रकारांना, आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांनी होणारी मारहान त्वरीत थांबविण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी केली आहे.
लातूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नृसिंह घोणे यांना 24 मार्च रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांचे समक्ष मारहान करण्यात आली आहे. प्रसारमाध्यामांनी पोलिसांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या कौतुकाच्या बातम्या कराव्यात अशी अपेक्षा असते. प्रामाणिकपणे व लोकभावनेतून चांगले काम करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांचे, कर्मचार्‍यांचे कौतूक होतेच. मात्र कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली अतिरेक करणार्‍या, सामान्य व निरपराध व्यक्तीस मारहाण करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांच्या बातम्या केल्या की संबंधित पत्रकार त्यांचे नावडते होतात. त्यांच्याविषयीचा राग मनात ठेवून एखादी संधी मिळाली की संबंधीत पत्रकारांवर वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवर गुन्हे दाखल केले जातात. प्रसंगी बेदम मारहाणही केली जाते. अशीच घटना हिंगोली शहरातील पोलिस स्टेशनमध्ये दि. 29-3-2020 रोजी घडली असून न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल यांना स.पो.नि. ओमकांत चिंचोळकर यांनी मनातील जुना राग व्यक्त करण्यासाठी इतर सहकार्‍यांच्या मदतीने दोनदा बेदम मारहाण केल्याची खात्रीशीर माहिती आहे. 
हिंगोली वाहतूक शाखेच्या वतीने लोकांना वाटलेले मास्क हे निर्जंतूक केलेले नसल्याचे पत्रकार खंडेलवाल यांनी यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिल्याचा राग चिंचोळकरांच्या मनात असल्याने त्यांनी कायद्याचा गैरवापर करून खंडेलवाल यांना बेशुध्द पडेपर्यंत मारहाण केली आहे. अशाच प्रकारची मारहाण लातूरमध्ये नृसिंह घोणे, बीडमध्ये मुधोळकर, ठाण्यामध्येही एका पत्रकारावर गुन्हा दाखल झाला आहे.
या सर्व घटना गंभीर असून याची तात्काळ दखल घेवून मा. मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करावी व पोलिस विभागाला योग्य सूचना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांनी केली असल्याची माहिती संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी दिली आहे.