पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह हद्दीलगतच्या गावांमधील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश*
पुणे, दि.15:- कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम लक्षात घेता, सदर विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून दुसऱ्या व्यक्तीस किंवा इसमास तसेच त्यांच्या संपर्कात आल्याने इतर व्यक्तीस होण्याची शक्यता विचारात घेवून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी, देहूरोड व पुणे कटक मंडळ तसेच शहर हद्दीलगतच्या गावांमधील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.
आदेशापर्यंतच्या कालावधीत दहावी आणि बारावीसह इतर सर्व प्रकारच्या परीक्षा नियोजनाप्रमाणे सुरू राहतील, परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बाक रिकामा ठेवावा, एका बाकावर एकच विद्यार्थी असेल अशी व्यवस्था करावी, जे विद्यार्थी मागील एका महिन्यांमध्ये परदेशातून आलेले आहेत त्यांच्या परीक्षेची व्यवस्था स्वतंत्र कक्षामध्ये करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या आहेत.
तसेच जे विद्यार्थी मागील एका महिन्यांमध्ये परदेशातून आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी पंधरा दिवस स्वतःच्या घरामध्ये ते जिथे राहत असतील तेथे विलगीकरण/अलगीकरण करणे आवश्यक आवश्यक आहे तसेच असे विद्यार्थी व संशोधन सहायक जर वसतीगृहात राहत असतील तर त्यांचे विलगीकरण करण्यासाठी आपल्या विद्यापिठात व विद्यापिठाच्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयात व शैक्षणिक संस्थामध्ये वेगळी इमारत किंवा जागा सुनिश्चित करावी जेणे करुन कोरोना विषाणूची लागण इतर विद्यार्थांना होणार नाही, याची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्यास देण्यात यावी. विलगीकरण कक्ष स्थापन करतांना संबंधित महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेवून त्यांच्या पर्यवेक्षकीय नियंत्रणाखाली सदरची कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या आहेत.
आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर भारतीय दंड संहिता कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात म्हटले आहे.
0000