-हुदयतेच्या                  अनंत 🌺 आठवणी* ! !

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*स-हुदयतेच्या                  अनंत 🌺 आठवणी* ! !  !


अनंत दीक्षितांचे निधन, ही वार्ता, अनपेक्षित नव्हती कारण त्यांचा अंतीम प्रवास, अनेकजणांना ज्ञात होता. 
माणसाने, उराशी ध्येय बाळगून निश्चित दिशेनेच  वाटचाल करणे हे स्वाभाविक असते. काही जणांना यश मिळते तर अनेकांची  दमछाक होते, परंतू ही वाटचाल हेच आपले आयुष्य असते,हा दीक्षितांचा आवडता सिद्धांत होता. त्यांच्या सहवासातील काही मोजक्या घटनांना आता उजाळा मिळत राहील. 
कामगारदिनाच्या पार्श्वभूमीवर, शनिवार पेठेतील बत्तीवाले वारे यांच्याकडील वयोवृद्ध कामगार,नामदेव पंडीत, यांचा सन्मान, सेवा मित्र मंडळातर्फे 2001 मधे करण्यात आला होता. अनंतरावांना हे समजल्यावर, सकाळच्या पहिल्या पानावर, शीर्षकाखालीच, ते छायाचित्र आंणि वार्तांकन, प्रसिद्ध करण्यात आले होते.एवढेच नव्हे तर, नामदेवना सकाळमधे बोलावून, सभागृहात  सहका-यां समवेत, चहापान सुद्धा, त्यांनी योजले होते. हे परूळेकरांचे वृत्तपत्र आहे, तळागाळातील वंचितांचा, इथे सन्मान राखायलाच हवा, हे दीक्षितांचे त्या वेळचे शब्द, माझ्या कायमचे स्मरणात आहेत. 
    लोकमतमधील कार्यभार स्वीकारल्यावर, पराग ठाकूर आणि मी, आवर्जून त्यांना भेटलो होतो. हस्तिदंती मनो-यातून पायउतार झाल्यावर, जमिनीशी नाते, अधिक दृढ होते. या काळात, जी माणसे, आपली साथ सोडत नाहीत, तीच महत्वाची असतात  . . हे त्यांचे   जखमी मनाचे शब्द, कायमचेच स्मरणात राहिले. 
   लोकमतच्या कारकीर्दीत, त्यांनी मला *सुवर्णक्षण* हे सदर चालविण्यासाठी जबाबदारी सोपवली. माणसांची निवड आणि शब्दांची मर्यादा, या बाबत, मला मुक्तपणा बहाल केला होता. ओंजळभर फुले आपण गोळा केली, तर त्यांचा सुगंध, आपल्यालाही मिळतोच, हे त्यांचे शब्द, माझ्या लेखनदिशेला,उपयुक्त ठरले. याच लेखांचे संकलन स्वरूप पुस्तका साठी,त्यांनी प्रस्तावना लिहून दिली. प्रकाशन समारंभाला सुद्धा, ते  आवर्जून उपस्थित होते. 
माझे हे लेखन आंणि आठवणींचा उजाळा म्हणजे साचेबद्ध, पश्चात गुणगौरव वा अरण्यरुदन मुळीच नाही. अखेरच्या दिवसात सुद्धा, त्यांच्याशी, सहकुटुंब, परस्पर सलोखा राखून होतो, याचे समाधान नक्की वाटते आहे. 
  वृत्तपत्रे आणि बातमीदारीच्या विश्वात, असे सुवर्णकण, हीच अस्सलता,कायम जाणवत राहील, याचा विश्वास आहे.
😊😊🙏😊😊
  *आनंद सराफ*