पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुण्यात कोरोना व्हायरस पाचवा रुग्ण
____________________________________
चीनमध्ये उद्रेक घातलेल्या करोना आजारानं जगभरासह भारतातही पाय पसरवायला सुरूवात केली आहे. करोनानं पुण्यात पाऊल ठेवलं असून, दोन जणांना लागण झाल्याचं मंगळवारी समोर आले. दुबईवरून परतलेल्या या रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली. यात आणखी तिघांना संसर्ग झाल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
चीनमधील वुहानमध्ये करोना विषाणू अचानक उद्रेक झाला. त्यानंतर काही दिवसांत करोना चीनमध्ये पसरला. त्यानंतर करोनानं जगभरातील अनेक देशात शिरकाव केला. जगभरात करोनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतात करोनाचं रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रातही करोनाचा शिरकाव झाला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह राज्यातील सरकारही खबरदारी घेत आहेत. विमानतळांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. दरम्यान, या खबरदारीनंतरही पुण्यात दोन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हे दोघे दुबईमध्ये ४० जणांच्या ग्रुपसह फिरण्यास गेले होते. तो देश केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित देशांच्या यादीमध्ये नसल्यानं त्यामुळे संशयित रुग्ण १ मार्चला भारतात परतल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही. त्यानंतर आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कुणाला झाला संसर्ग?
दोघांना लागण झाल्याचं कळल्यानंतर पुणे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. दुबईहून परतेल्या करोनाग्रस्त रुग्ण ज्यांच्या संपर्कात आले. त्यांची शोधाशोध सुरू असून, त्यातील काही जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात या दाम्पत्याच्या मुलीला करोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर ज्या कॅबने ते मुंबईहून पुण्याला आले, त्या कॅबचालक आणि विमानात त्याचसोबत असलेल्या एका सहप्रवाशाला करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे पुण्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५ झाली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.