गरजूंच्या मदतीला पारले धावणार; ३ कोटी बिस्कीट पुडे मोफत वाटणार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


गरजूंच्या मदतीला पारले धावणार; ३ कोटी बिस्कीट पुडे मोफत वाटणार
___________________________________


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवस लॉकडाऊन पाळला जाणार असल्याची घोषणा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. या काळात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्वच कार्यालयं बंद असणार आहेत. या लॉकडाऊनचा फटका हातावर पोट असलेल्या कित्येक गरजूंना बसणार आहे. याच गरजूंच्या मदतीसाठी आता पारले कंपनी धावून आली आहे. सरकारी विभागांच्या मदतीनं पारले ३ कोटी बिस्कीट पुड्यांचं मोफत वाटप करणार आहे.  


देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यानं सध्या कंपनीतला ५० टक्के कर्मचारी वर्गच कार्यरत असल्याचं पारलेनं सांगितलं. मात्र बाजारात पुरेसा साठा उपलब्ध राहावा, यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय लॉकडाऊनचा फटका बसलेल्या गरजूंना कंपनीतर्फे मोफत बिस्कीट पुड्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती पार्ले प्रॉडक्टचे वरिष्ठ प्रवर्ग प्रमुख मयांक शहा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.


आम्ही सरकारबरोबर काम करण्याचे ठरवलंय. सरकारी यंत्रणेमार्फत बिस्किटांचे तीन कोटी पुडे पुढील तीन आठवड्यांत गरजू लोकांना वाटण्यात येतील. प्रत्येक आठवड्यामध्ये एक कोटी असे तीन आठवड्यांमध्ये तीन कोटी पुडे कंपनीमार्फत दिले जाणार आहेत, असं शहा यांनी सांगितलं.


ते पुढे म्हणाले की, सध्या लोकांना अन्नधान्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचं पोट भरण्याला प्रथम प्राधान्य आहे. कारण रोजगार थांबल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेसोबत कोणी उपाशी राहू नये यासाठी आम्ही काम करणार आहोत.